मुंबई- एक शरद सगळे गारद.. या शिर्षकाखाली सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रदिर्घ मुलाखत घेतली. या मुलाखती मध्ये शरद पवार यांनी २०१४ च्या सत्तास्थापने बाबत एक गौप्यस्फोट केला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीला शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करू नये असे वाटत होते. त्यासाठी आम्ही भाजपला पाठिंबा देतो, असे वक्तव्य करून संभ्रम निर्माण केला, ती आमची राजकीय चाल होती, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर दोन गंभीर आरोप केले होते की, 2014 साली राष्ट्रवादीला भाजपबरोबर सरकार बनवायचे होते. सुरुवातीच्या काळात, शरद पवारांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर सरकार शिवसेनेबरोबरच बनलं, पण मधल्या काळात शरद पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते हे महाराष्ट्रात सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा करीत होते, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले असल्याचा प्रश्न संजय राऊत यानी उपस्थित केला. त्यावर पवार बोलत होते.
पवार म्हणाले, 'माझ्याही वाचनात आलं आहे. मात्र, ते म्हणतात त्याप्रमाणे त्या काळामध्ये एकदा मी कॉन्शिअसली स्टेटमेंट केले होते, ते शिवसेना आणि भाजपचे सरकार बनू नये म्हणून, असे स्पष्टीकरण पवार यांनी यावेळी दिले.
पवार यांच्या या उत्तरावर हे कशासाठी केलंत? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले, ' माझी पहिल्यापासूनची मनापासून इच्छा होती की, शिवसेनेने भाजपबरोबर जाऊ नये. ते जातील असे ज्यावेळी दिसले तेव्हा मी जाणीवपूर्वक स्टेटमेंट केले की, आम्ही तुम्हाला म्हणजे भाजपला बाहेरून पाठिंबा देतो. हेतू हा होता की, शिवसेना त्यांच्यापासून बाजूला व्हावी. हे घडलं नाही… त्यांनी सरकार बनवलं आणि चालवलं.. त्याच्याबद्दल वाद नाही, पण आमचा हा सतत प्रयत्न होता की, भाजपच्या हातात सरकार चालवू देणं हे शिवसेनेच्या हिताचे नाही. का? दिल्लीची सत्ता त्यांच्या हातात… राज्याची सत्ता म्हणजेच मुख्यमंत्री त्यांच्या हातात. यामुळे शिवसेना किंवा अन्य पक्षांना लोकशाहीमध्ये त्यांच्या पक्षाचं काम करण्याचा अधिकार आहे. हेच मुळात त्यांना मान्य नाही आणि त्यामुळे ते आज ना उद्या या सर्वांना निश्चितपणाने धोका देणार आहेत. आणि म्हणून आमची ही एक राजकीय चाल होती. त्यामुळे फडणवीस जे सांगतात ते आपल्याला मान्य नाही… पण त्यांच्यात व शिवसेनेत हे अंतर वाढावं यासाठी आम्ही जाणीवपूर्वक पावले टाकली हे मी कबूल करतो, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.