मुंबई :शरद पवार हे राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपले राजकारण सुरू केलं. बारामती चे आमदार ही ओळख घेऊन राजकारणात आलेल्या शरद पवार यांनी पहिल्यांदा आपल्या राजकीय चाली आणि डावपेच यांचा वापर 1978 मध्ये केला. 1978 मध्ये जनता पक्षाच्या साथीने आलेल्या सरकार मधून 40 आमदारांसह बाहेर पडत पुलोदची स्थापना करून नवीन सरकार स्थापन करत पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. काँग्रेस पक्षातून पहिल्यांदा ते बाहेर पडले.
पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल :1980 नंतर देशातील राजकीय परिस्थिती बदलली असताना इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुन्हा एकदा शरद पवार काँग्रेसमध्ये सामील झाले. 1986 मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर 1988 मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते.
सोनिया गांधी यांच्याशी वैचारिक मतभेद :देशाच्या राजकारणामध्ये संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या शरद पवार यांना पंतप्रधान पदाची खुर्ची मिळू शकली नाही त्यातच सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेल्यानंतर सोनिया गांधी यांच्या परदेशी मुळाचा उल्लेख करीत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.