मुंबई -मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याचबरोबर राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील विभागनिहाय निर्णय खालीलप्रमाणे आहेत.
- सामान्य प्रशासन विभाग
राज्य निवडणूक विभाग असा नवीन विभाग निर्माण करण्याचा 14 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय रद्द करून पूर्वी प्रमाणेच सामान्य प्रशासन विभागाची एक शाखा म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय गणण्यात यावे, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्य मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्य निवडणूक विभाग स्वतंत्र करण्याचा व निवडणूक शाखेसाठी 128 पदे निर्माण करण्याबाबत 14 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय काढण्यात आला होता. मात्र, भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक कार्यालयात नव्याने पद निर्माण करण्याचे निर्देश असून नवीन विभाग निर्माण करण्याचे निर्देश नाहीत. त्याचप्रमाणे तसा प्रस्तावही सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वरील प्रमाणे स्वतंत्र राज्य निवडणूक विभाग निर्माण करण्यास दिलेली मान्यता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
या विभागासाठी 1.02 कोटी रुपये खर्चास दिलेली मंजुरी देखील रद्द करण्यात आली. यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील 33 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राज्य निवडणूक विभागात कायम स्वरुपी केलेले समावेशन देखील रद्द करण्यात आले आहे.
- अन्न, नागरी पुरवठा विभाग -
डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारुप मागे घेण्यात आले आहे. 2014-15 मध्ये डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मंत्रिमंडळाने दिनांक 26.04.2016 च्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात डाळींचे दर नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचे प्रारूप तयार करून केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सादर केले होते.
केंद्र शासनाने आता जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) अधिनियम,2020 मंजूर केला असून राष्ट्रपतींनी त्यास मान्यता दिल्यानंतर 5 जून, 2020 पासून तो अंमलात आला आहे. त्यानुसार तृणधान्य, डाळी, कांदा, बटाटा, खाद्यतेल व खाद्यतेल बिया यांचे नियमन केवळ युद्ध, दुष्काळ, आत्यंतिक भाववाढ आणि गंभीर स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती यासारख्या अतिविशिष्ट परिस्थितीतच करता येईल अशी तरतूद केली आहे. त्यामुळे दर नियंत्रक विधेयकाची आवश्यकता राहिली नसल्याने सदर विधेयकाचे प्रारूप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
- नगर विकास विभाग -
नागपूर शहर व परिसरात रेल्वेच्या सध्याच्या पॅसेंजर ट्रेन्सऐवजी आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन्स सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस) ही सेवा जोडली जाईल. महामेट्रोने यासाठी 333.60 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प सादर केला आहे.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे सहाय्य म्हणून 21.30 कोटी रुपये राज्य शासनाकडून बिनव्याजी दुय्यम कर्जसहाय्य म्हणून देण्यात येईल. या व्यतिरिक्त भविष्यात देखील राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. महामेट्रो, राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य करारनाम्यास कार्योत्तर मंजुरीही देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा खर्च नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-1 या प्रकल्पासाठी केएफडब्ल्यू या वित्तीय संस्थेच्या 305 कोटी 20 लाख रुपये या मंजूर कर्ज सहाय्यामधून करण्याचे प्रस्तावित आहे.
ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे प्रकल्प हा नागपूर ते वर्धा, नागपूर ते नरखेड, नागपूर ते रामटेक आणि नागपूर ते भंडारा रोड या मार्गांवर सुरु होणार असून यामध्ये 42 स्थानके उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे वेगवान आणि आरामदायी प्रवास होईल. तसेच रहदारीचा भाग नागपूर मेट्रोकडे वळेल. चांगल्या परिवहन सेवेमध्ये या संपूर्ण प्रदेशाचा विकास होण्यास देखील मदतच होईल.
- सहकार विभाग -
कोविडमुळे सहकारी संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरु आहे. मात्र, या मुदतवाढीमुळे महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्याबाबत विलंब लागू शकतो. म्हणून मंजुरीचे अधिकार वार्षिक सर्वसाधारण सभेऐवजी संचालक मंडळास देण्याबाबत सहकारी संस्था अधिनियमात दुरुस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
शिवाय, संस्थेमधील शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार, पुढील वर्षाच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे व लेखापरिक्षकाची नेमणूक करणे, अशा महत्वाच्या विषयांबाबत 2020-21 साठी वार्षिक सर्वसाधारण सभेने मंजूर करण्याऐवजी मंजुरीचे अधिकार संचालक मंडळास देण्याचा तसेच सदर संचालक मंडळाच्या मंजुरीला लगतच्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरी घेणे आवश्यक असल्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच ज्या संचालक मंडळाचा शिल्लक असलेला कालावधी अडीच वर्षापेक्षा कमी आहे. अशा संचालक मंडळामधील रिक्त पदे ज्या प्रवर्गातील आहेत. त्याच प्रवर्गातील सदस्यांमधून नामनिर्देशनाने भरण्याबाबतचा अधिकार संचालक मंडळाला असेल. असा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभा होईपर्यंत संस्थेस नफ्याच्या कोणत्याही भागाचा विनियोग करता येणार नाही. त्याचप्रमाणे सभासदांना दसरा दिवाळी पूर्वी लाभांश देणे, पुढील वर्षाच्या आर्थिक पत्रकास मंजुरी देणे, लेखा परिक्षकाची नियुक्ती करणे, याबाबत देखील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 65, कलम 75 व कलम 81 मध्ये सुधारणा करण्यास व अध्यादेश प्रख्यापित करण्यात आज मान्यता देण्यात आली.
- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग -
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधील आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 1 मे 2020 पासून दरमहा 10 हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच विद्यावेतन वाढ देण्यात आली आहे.