मुंबई- हवामान खात्याने 26 जुलैपासून 3 ते 4 दिवस मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळनंतर पावसाने मुंबईला झोडपले. शुक्रवारी पडलेल्या या पावसामुळे मुंबई तसेच कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला.
मुंबईत सलग 5 दिवस पाऊस सुरू आहे. कधी मुसळधार, कधी संततधार पडणाऱ्या पावसाने मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगराला झोडपून काढले. दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, सांताक्रुझ, मालाड, गोरेगाव, सायन, कुर्ला, विद्याविहार, मुलुंड, भांडुप, कांजूर ते विक्रोळी-घाटकोपर आदी भागात गुडघाभर पाणी साचले होते. अनेक सखल भागातही पाणी साचले होते. त्यामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ, वांगणी आदी ठिकाणी पाणी साचल्याने कल्याण ते कर्जत आणि खोपोली पर्यंतची वाहतूक बंद पडली. त्यामुळे या ठिकाणचे प्रवाशी मुंबईत येऊ शकले नाहीत. परिणामी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी होती. कल्याण ते कर्जत खोपोली पर्यंतची सेवा सायंकाळी 6 पर्यंत पूर्ववत झालेली नव्हती.