मुंबई -अनेक दिवसांपासून दडी मारल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना अखेरकार पावसाच्या आगमनाने दिलासा भेटला आहे. मुंबईत सकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे मुंबईतील हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकर काहीसे सुखावले आहेत. त्यात मान्सून आजपासून पूर्णतः सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला-गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांना वाट पाहण्यास भाग पाडणारा मान्सून अखेर आज दाखल झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात मान्सून आजपासून सक्रीय झालेला आहे. वास्तविक दरवर्षी राज्यात पावसाळा ७ जून रोजी सुरुवात होते. पण यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता. कोकणात ११ जून रोजी मान्सून थोड्याफार प्रमाणात आल्या नंतर १५ जूनपर्यंत राज्यात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. आजपासून राज्यात मान्सून सक्रीय होणार असल्याचा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे.
मुंबईकर सुखावले - मुंबईतील अनेक भागात आज रिमझीम पावसाला सुरुवात झाल्याने अनेक महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबईत मान्सून अजून पूर्णपणे सक्रिय झाला नसला तरी पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. काल रात्री सुद्धा मुंबईच्या विविध भागात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईच्या परिसरात देखील पावसानं हजेरी लावली असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.आजच्या दिवसाची भरती - ओहोटी ची वेळ पाहता समुद्रात ३.९२ मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे उद्याही समुद्रात ३.१८ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.
विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस -हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने वाढणार असल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. मुंबईत आज पूर्णतः ढगाळ वातावरण आहे. मुंबईसहित कोकण पट्ट्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. या जून महिन्यात आत्तापर्यंत २०.७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण सरासरीपेक्षा ८१ टक्क्यांनी कमी आहे. मान्सून लांबल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची पातळी अतिशय खालावली आहे. त्यातच मुंबईमध्ये पाणी कपातीचे संकट समोर असताना मान्सून च्या आगमनामुळे मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला आहे.
हेही वाचा -
- Monsoon Arrived In Vidarbha : मान्सून मुंबईच्याआधी आला विदर्भात; असे आहे कारण...
- Sevagram Ashram Wardha: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 'अशी' घेतली जाते वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाची काळजी