मुंबई -राज्यातील प्रत्येक खासगी डॉक्टरने किमान 15 दिवस कोव्हिड रुग्णालयात काम करणे आता बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचा डॉक्टरकीचा परवाना रद्द होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी हा नियम केवळ महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीकृत आयएमएच्याच डॉक्टरांसाठी असल्याने त्यावर थोडी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातूनच त्यांनी आयुष डॉक्टरांसह इतर कौन्सिलच्या डॉक्टरांनाही हा नियम लागू करण्याची मागणी केली आहे.
'सरकारच्या निर्णयाचे स्वागतच, पण आयएमएबरोबर इतर कौन्सिलच्या डॉक्टरांनाही नियम लागू करावा' - IMA
राज्यातील प्रत्येक खासगी डॉक्टरने किमान 15 दिवस कोव्हिड रुग्णालयात काम करणे आता बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचा डॉक्टरकीचा परवाना रद्द होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्यात कोरोनाचा कहर असून मुंबई महानगरपालिका आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा देत आहेत. अशावेळी हजारो खासगी डॉक्टर घरात बसून आहेत. संकटाच्या काळातच रुग्णसेवा विसरणाऱ्या या डॉक्टरांना अखेर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने दणका दिला आहे. राज्यातील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या सर्व नोंदणीकृत डॉक्टरांना आता 15 दिवस कोव्हिड रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर ही सेवा न देणाऱ्या डॉक्टरांविरोधात परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता आयएमएच्या डॉक्टरांना सेवा देणे गरजेचे आहे.
आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण आयएमएचे अनेक डॉक्टर आपापल्या क्लिनिकमध्ये वा खासगी रुग्णालयात सेवा देत आहेत. तेव्हा त्यांना यातून वगळणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच राज्यात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचेच नाही तर आयुषसह इतरही डॉक्टर कार्यरत आहेत. तेव्हा त्यांना हा नियम लागू करावा अशी मागणीही भोंडवे यांनी केली आहे.