मुंबई -केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने आयुर्वेदिक शस्त्रक्रियेला परवानगी दिली आहे. ही परवानगी म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळ असून यामुळे आरोग्य व्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे, असे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने याला जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी करत यासाठी देशव्यापी आंदोलन छेडले आहे. तसेच या आंदोलनाची दखल घेतली नाही, हा निर्णय 11 डिसेंबरनंतर रद्द झाला नाही तर या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
आयुष डॉक्टर विरुद्ध अॅलोपॅथी डॉक्टर आमने-सामने -
कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने 24 नोव्हेंबरला एक अध्यादेश काढला आहे. त्यानुसार आयुर्वेदात एमएस पदवी अर्थात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना आता 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येणार आहेत. तसा अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. या ज्या 58 शस्त्रक्रिया आहेत त्या आयुर्वेदातीलच आहेत, असे म्हणत केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांनी विरोध केला आहे. अॅलोपॅथी डॉक्टर 8 ते 10 वर्षे अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण घेत त्यानंतर कित्येक वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर शस्त्रक्रियेत माहीर होतात. तर शस्त्रक्रिया ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे. तेव्हा आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याना ही शस्त्रक्रिया कशी करता येईल, असा सवाल आयएमएने केला आहे.