मुंबई- शहरातील बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी २३ सार्वजनिक वाहनतळांलगत होणाऱ्या अनधिकृत पार्कींगवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. या आदेशाच्या जनजागृतीसाठी दादर परिसरात महानगरपालिकेतर्फे बॅनर लावले जात आहेत. मात्र, या आदेशावर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
'रस्त्यावर बेकायदा पार्कींग करू नका, वाहनतळाचा वापरा करा' अन्यथा १० हजार रुपये दंड करू, असे आवाहन महापालिकेने लोकांना केले आहे. या आदेशावर कालपासून दंडात्मक कारवाईची सुरुवात जी-दक्षिण विभागापासून करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. यापैकी ९ वाहन मालकांकडून ९०,००० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, या कारवाईविरोधात नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. 'जेवढा आम्हाला पगार नाही, त्यापेक्षा जास्त दंड आकारला जात आहे. हे चुकीचे आहे" अशी प्रतिक्रिया नागरिकांनी खासगीत दिली आहे.