महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाडियाच्या बेकायदेशीर कारभारामुळे रुग्णांचेच नुकसान; दिलासा देण्यासाठी उपायांची गरज - wadia hospital closure protest

रुग्णालयातील अनियमिततांबाबत उद्या पालिका आणि वाडिया ट्रस्ट यांची निर्णायक बैठक होणार असून तोडगा काढला जाईल. वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

mumbai
वाडिया रुग्णालय

By

Published : Jan 14, 2020, 3:37 PM IST

मुंबई- शहरातील लहान मुले आणि प्रसुतीसाठी प्रसिद्ध असलेले वाडिया रुग्णालय निधी अभावी बंद पडणार आहे, असा दावा रुग्णालयाकडून केला जात आहे. तर, रुग्णालयात गैरकारभार केला जात आहे. बेकायदेशीर भरती करण्यात आली आहे. कर्मचारी दुप्पट पगार आणि पेन्शन घेत आहेत, असे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या चौकशीतून समोर आले आहे. रुग्णालयात सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. ट्रस्टने रुग्णालय बंद केले किंवा पालिका आणि सरकारने त्यावर कारवाई केली तरी नुकसान रुग्णांचेच होणार आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

प्रसुती व लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेले परळ येथील वाडिया रुग्णालय २६ जुलै १९२६ व २ एप्रिल १९२८ साली सुरू करण्यात आले. गिरणी कामगारांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून पालिकेने रुग्णालय चालवण्यासाठी जमीन वाडिया ट्रस्टला दिली. या जमिनीवर २४६ खाटांचे वाडिया रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यातील ५० खाटा गिरणी कामगारांसाठी मोफत सेवा देण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या. याबाबत वाडिया, राज्य सरकार व पालिका यांच्यात करार झाला. मात्र, आजमितीस खाटांची संख्या ९२५ पर्यंत वाढली आहे. शासन निर्णयानुसार ३१८ पदे मंजूर आहेत. परंतु, वाडिया रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. खाटा व स्टाफ वाढवण्याबाबत ट्रस्टने पालिका प्रशासनाला विचारात न घेता निर्णय घेतला. हे कराराचा भंग करणारे असल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

वाडिया रुग्णालयात सुरू असलेल्या गैरप्रकाराबाबत तक्रारी आल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने अचानक रुग्णालयाची पाहाणी केली. त्यात नियमानुसार ठरलेले शुल्क न आकारता दुप्पट, तिप्पट शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच ट्रस्टने उत्पन्न व खर्चाचा आजमितीस अहवालही पालिकेला दिलेला नाही, असे प्राथमिक चौकशीतून समोर आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. वाडिया ट्रस्टकडून चालवल्या जाणाऱ्या दोन्ही रुग्णालयात काम करणाऱ्या १० ते १५ अधिकारी, कर्मचारी दुबार वेतन आणि निवृत्ती वेतन घेत असल्याचेही उघड झाले आहे. नियमानुसार रुग्णालय चालवले जात नसल्याने पालिकेने गेल्या डिसेंबर महिन्याचे २१ कोटी रुपये अनुदान दिले नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

वाडिया रुग्णालयामधील गैरप्रकाराची चौकशी पालिकेकडून केली जात आहे. चौकशीमधून काही निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. दुप्पट वेतन तसेच वेतन आणि पेन्शन कसे दिले जाते याची माहिती पालिकेने मागावली आहे. यासाठी पालिकेने आणि मुख्यमंत्र्यांनी वाडिया ट्रस्टला मीटिंगसाठी बोलावले आहे. या बैठकीत वाडिया ट्रस्टकडून रुग्णालयात अतिरिक्त खाटांचा विषयही चर्चेला येणार आहे. यामुळे या खाटा बेकायदेशीर असल्यास रुग्णालयावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. रुग्णालय बंद पडले किंवा रुग्णालयातही बेकायदेशीर खाटांवर कारवाई झाली तरी नुकसान मात्र रुग्णांचेच होणार आहे.

एकूण देणे रक्कम २१ कोटी

पालिकेकडून बाल रुग्णालयाला १०० टक्के तर प्रसूतीगृहाला ५० टक्के अनुदान दिले जात होते. बॅलन्स शीटनुसार ही रक्कम देण्यात येत होती. मात्र, यामध्ये अनियमितता आढळल्यामुळे १० टक्के अनुदान रोखण्यात आले आहे. यामध्ये पालिका एकूण २१ कोटींची रक्कम वाडिया रुग्णालयाला देणार आहे. दरम्यान, पालिकेने रुग्णालयाचे १३७ कोटी थकवले असल्याचे वाडिया ट्रस्टकडून सांगण्यात आले. वाडिया रुग्णलायाचा कारभार वाडिया ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जातो. घेतलेल्या सर्व निर्णयांवर बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची देखरेख असते. त्यानुसारच गेल्या काही वर्षांत निर्णय घेण्यात आले असल्याचे वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. दरम्यान, रुग्णालयातील अनियमिततांबाबत उद्या पालिका आणि वाडिया ट्रस्ट यांची निर्णायक बैठक होणार असून तोडगा काढला जाईल. वाडिया रुग्णालय बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा-'तारापूर स्फोटाची सखोल चौकशी करा' मुख्यमत्र्यांनी दिला आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details