मुंबई- वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगवर उपाय म्हणून पालिकेने बेकायदेशीर पार्किंग करणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मात्र, या कारवाईला मुंबईकरांकडून विरोध झाल्याने पाच ते दहा हजारांपर्यंत असलेला दंड आता एक हजारापर्यंत करण्याचा विचार पालिका प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
मुंबईत बेकायदा पार्किंगमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्यामुळे पालिकेकडून बेकायदा पार्किंग करणार्यांवर पाच ते दहा हजारांवर दंड आकरण्यात येत आहे. पालिकेच्या पार्किंगपासून 500 मिटरच्या आत बेकायदा पार्किंग केल्यास हा दंड वसूल केला जात आहे. मात्र, सर्वसामान्यांकडून ही मोठी रक्कम भरण्यास अनेक वेळा विरोध होऊन वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. अनेक सोसायट्यांजवळ ही पार्किंग असल्याने रहिवाशांचाही या धोरणाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर 10 हजारांचा दंड कमी करण्याबाबत पालिका प्रशासन विचार करत आहे. हा दंड किती कमी करावा याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मुंबईत सध्या ए, बी, सी अशा तीन प्रकारांच्या पार्किंगसाठी अनुक्रमे 20, 40 आणि 60 रुपये असे दर आकारले जातात. तर पूर्ण दिवसासाठी 200 रुपये आकारले जातात. नवीन दरानुसार बेकायदा पार्किंगसाठी पाच पट म्हणजे किमान एक हजारांपर्यंत दंड आकारला जाईल, अशी शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.