मुंबई - राज्यात कोरोना व्हायरसाचे रुग्ण वाढत असून प्रशासकीय स्तरावर त्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी देखील आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढू नये म्हणून अत्यावश्यक सेवा नसलेले आस्थापने बियर बार, वाईन शॉप आदी मद्य विक्री ठिकाणे बंद करण्यात आले आहे. असे असतानाही राज्यात दारूची अवैध वाहतूक होत असल्याने या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा...विलगीकरणातून बाहेर आलेल्या १७ तबलिगींना पाठवले थेट तुरुंगात...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 11 एप्रिल या एकाच दिवसात केलेल्या कारवाईत तब्बल १०२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दरम्यान ८ वाहने देखील जप्त करण्यात आली असून तब्बल १६ लाख ३४ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २४ मार्च ते ११ एप्रिल पर्यंत करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान २ हजार ३८३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच ९३७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच आतपर्यंत ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.