मुंबई :ठिकठिकाणी बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग्ज लावण्यावर निर्बंध आहेत. परिणामी, मुंबईच्या सौंदर्याला बाधा पोहोचत आहे. राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडून फुकटच्या जाहिरातीसाठी मनपा नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. मुळात, होर्डिंगसाठी पालिकेची रीतसर परवानगी घ्यावी लागते. मात्र, अनेकजण रितसर परवानगी घेणे टाळतात. या फलकबाजीत राजकीय कार्यकर्ते आघाडीवर आहेत. यासाठी अनेकदा राजकीय वजनाचा वापर होतो आहे. मनपाचा महसूल यामुळे मोठ्या प्रमाणात बुडत आहे. डिजीटल फ्लॅक्समुळे प्लास्टिक कचऱ्यातही वाढ झाली आहे, असे मुंबई मनपाच्या अहवालातून नमूद आहे.
बॅनरवरील कारवाईचा अहवाल जाहीर :मुंबई मनपाने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंतचा बॅनरवरील कारवाईचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार वर्षभराच्या कारवाईत तब्बल १६ हजार ३६० होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई तर १६४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय पुढार्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, आदी कार्यक्रमांच्या जाहिरातींचे अनधिकृत होर्डिंग दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वाधिक धार्मिक बॅनरचा यात समावेश आहे. यातील बहुतांशी होर्डिंग्ज बेकायदा तक्रारींची पालिकेकडे नोंद आहे. या कारवाईत ९७१९ धार्मिक, ४८२३ राजकीय आणि १८१८ व्यावसायिक बॅनर आहेत. पैकी ९६१ प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.