मुंबई -दर्शन सोळंकी याने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयआयटीच्या आवारात आत्महत्या केली होती. जातीय भेदभावाच्या वागणुकीचा त्रास झाल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी तसेच काही विद्यार्थी संघटनांनी केला होता. या घटनेला आयआयटीमधील प्रशासन आणि वातावरणातील जातीय व्यवस्था कारणीभूत आहे, असा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी याआधी केलाच होता. मात्र, आता त्यांनी आयआयटीने मागील दहा दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेला अहवाल नाकारला आहे.
दर्शनच्या कुटुंबीयांचा आरोप - आयआयटीच्या प्राध्यापक नंदकिशोर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाचाी चौकशी केली. त्यानंतर या समितीने ही आत्महत्या जातीभेदातून झाली नसल्याचे स्पष्ट केले व तसा अहवाल सादर केला. हा अहवाल दर्शनच्या कुटुंबीयांनी नाकारला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या वेळेला प्राध्यापक नंदकिशोर समिती याबाबत चौकशी करत होती तेव्हा त्याच्या वर्गमित्रांशी ते बोलले. मात्र, दर्शनच्या सख्ख्या बहिणीशी ते बोलले नाहीत. हा काय प्रकार आहे? येथे देखील चौकशीची पद्धत विषम होती, असे दिसून येते. तसेच जातीभेदाचे कोणतेही मुद्दे चौकशी समितीने विचारात घेतले नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.