मुंबई - पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या पथकाला दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट सापडल्याने मोठी गती या तपासाला मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये दर्शनने एका विद्यार्थ्याचा छळ केल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सहआयुक्त गुन्हे शाखा लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली होती.
सुसाईड नोट सापडली - या पथकाच्या तपासादरम्यान, दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येमागील एक कारण म्हणजे त्याच्यावर जातीवाचक टिप्पणी असल्याचे एसआयटीला समजले आहे. तसेच एसआयटीच्या सूत्रांनी पुढे सांगितले की, एसआयटी पथकाला दर्शन सोळंकी याच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये 'अरमान याने माझी हत्या केली आहे' असे लिहिले आहे. पोलिस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, अरमान इक्बाल खत्री नावाच्या विद्यार्थ्याचे नाव असून ज्यावर सोळंकीचा छळ केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप आहे. सापडलेली ती धक्कादायक सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली आहे व त्याअनुषंगाने तपास सुरू केला.