मुंबई IIT Mumbai Work:फेसबुक, आयआयटी तसंच राष्ट्रीय विधी विद्यापीठ यांनी 'लार्ज लैंग्वेज मॉडेल' माध्यमातून ग्राहक तक्रार निवारण सुधारण्यासाठी सुरुवात केलेली आहे. भारताच्या सर्व राज्यांमध्ये शेकडो स्थानिक भाषा आहेत. त्या भाषांमध्ये प्रचंड प्रमाणात व्यवहार होतो. आपण आपल्या भाषेमध्ये मोबाईलवरून फेसबुकच्या लिंकवर किंवा त्या मोबाईल क्रमांकावर व्हॉइस टायपिंग करायचं किंवा हाताने टायपिंग करायचं आणि त्या सर्व भारतीय भाषांचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला जाईल. इंग्रजीचा अनुवाद भारतीय भाषांमध्ये केला जाईल. त्यामधून ग्राहक तक्रार निवारण केलं जाईल. ग्राहक यातून मार्गदर्शन माहिती मदत मिळवू शकतात. हे सर्व मोबाईलवर घरबसल्या करता येईल.
तक्रार निवारणासाठी चॅटबॉट करणार मदत :यासंदर्भात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक पुष्पक भट्टाचार्य म्हणाले की, समजा तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी उभे आहात तुम्ही दुकानातून एखादं प्रॉडक्ट विकत घेतलं किंवा घर खरेदी करताय; पण तुम्हाला प्रॉडक्टबाबत तक्रार असेल, तर तुम्हाला तक्रार कुठे करायची ती तक्रार कशी करायची, तक्रार कोणत्या कायद्यांतर्गत करायची पद्धत काय असेल, सर्व बाबतीत 'आर्टिफिशल इंटेलिजन्स'च्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाईल.
कोणत्या कोर्टात जायचे हे सांगणार :आयआयटी मुंबईचे प्रा. पुष्पक भट्टाचार्य म्हणाले, सुरुवातीला इंग्रजीमध्ये आणि नंतर सर्व भारतीय भारतीय भाषांमध्ये मशीन लर्निंगद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कायदेशीर सल्ला देखील दिला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवाबाबत तुम्ही समाधानी नाहीत. काही तक्रार असेल तर ग्राहक कोर्टात जायचं किंवा नाही किंवा तुम्हाला सत्र न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात जाण्याची गरज आहे किंवा नाही, हे देखील सांगितलं जाईल. तशी गरज असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, अशा सर्व बाबींमध्ये तुम्हाला माहिती द्वारे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून मार्गदर्शन दिले जाईल. ज्यामुळे तुमचा वेळ, श्रम आणि पैसा देखील वाचेल. इंटेलिजन्स चॅटबॉटच्या माध्यमातून ही मदत केली जाणार.
ग्राहक न्यायालयाला होणार मदत :ग्राहक न्यायालयात खटल्याची सुनावणी करताना, निकाल देताना याचा उपयोग होईल. मागील न्यायालयाचे संदर्भ, दाखले त्यात आवश्यक असतात. त्यात देखील आता मदत होईल. AI सर्वोच्च न्यायालयाचे किंवा कोणतेही मागील संदर्भ पटकन शोधून देऊ शकते, असे प्रा. पुष्पक भट्टाचार्य म्हणाले. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर कृष्णा स्वामी म्हणाले की, अत्यंत क्रांतिकारक आणि परिवर्तन कार्य उपक्रम फेसबुक, नॅशनल युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मुंबई सुरू करत आहे. त्यामुळे सामान्य भारतीयांच्या जगामध्ये गुणात्मक फरक येईल.