मुंबई IIT Mumbai :आयआयटीनं तयार केलेल्या या केंद्रात विद्यार्थ्यांमधील ताणतणाव दूर करण्यासाठी वेगवेगळ्या थेरपींचा वापर होतो. यामध्ये योगा डॉग थेरपी, फूट मसाज, पेट थेरपी, आर्ट थेरपीसारख्या उपचारपद्धतींचा समावेश आहे. जसजसे प्लेसमेंटचे दिवस जवळ येतात तसतसे आयआयटीतील विद्यार्थ्यांमध्ये ताणतणावपूर्वक वातावरण बघायला मिळतं. त्यामुळं या विद्यार्थ्यांना गरज भासल्यास समुपदेशनाची सुविधा स्टुडंट्स वेलनेस सेंटरतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दिली जात आहे.
आयआयटी प्लेसमेंट सीझनचे विद्यार्थी अनेकदा गोंधळलेले असतात. अनेकांमध्ये पराकोटीची अस्वस्थता असते. या काळात एक सर्वसमावेशक दृष्टिकोन बाळगून केवळ त्यांचं समुपदेशनच नव्हे तर माईंडफुलनेस कृतीतून त्यांच्या ताणतणावांना मोकळी वाट करून देण्याचा हा प्रयत्न आहे. -शौकत अली, समुपदेशक
डॉग थेरपीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद : यासंदर्भात अधिक माहिती देत केंद्राचे हंगामी प्रमुख आणि समुपदेशक शौकत अली म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून आपला मानसिक तणाव कमी करायचाय, त्यांच्यासाठी या ठिकाणी रंग, ब्रश, कॅनव्हास यांची सोय करण्यात आलीय. तसंच येथे डॉग थेरपीही उपलब्ध करून देण्यात आलीय. यासाठी केंद्रात दोन कुत्री असून विद्यार्थी त्यांच्याशी येऊन कितीही वेळ खेळू शकतात. तसंच विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळतोय, असंही त्यांनी सांगितलं.