मुंबई - 'तंत्रज्ञानाच्या आधारावरच आज जग चालत आहे. आताच्या काळात अकल्पित असे तंत्रज्ञान आणि त्याचा विकास होताना दिसतोय, यामुळे ज्या तंत्रज्ञानाचा फायदा तुमच्या देशातील नागरिकांनाच नव्हे तर जगभरातील लोकांना होईल, असे तंत्रज्ञान विकसित करा, असे आवाहन नोबेल पारितोषिक विजेते डंकन हॅल्डेन यांनी रविवारी केले.
आयआयटी मुंबईचा ५८ वा आणि दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. काल(रविवार) आयआयटी मुंबईचा आभासी पद्धतीने दीक्षांत सोहळा पार पडला. पहिल्यांदाच झालेल्या या अनोख्या आणि चकित करणाऱ्या तंत्रविष्काराच्या सोहळ्याल देश-विदेशातील असंख्य विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
डंकन हॅल्डेन पुढे म्हणाले की, आपले शास्त्रज्ञ नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. ते ज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी तंत्रज्ञ महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे आयआयटीमधील विद्यार्थ्यांना भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या संधी आहेत. तुमच्यापैकी काही विद्यार्थी शास्त्रज्ञ होतील. मात्र, बहुतांश हे टेक्नॉलॉजिस्ट होतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शुभाषिष चौधरी यांनी वर्ष अहवालाचे वाचन करत आयआयटी मुंबईच्या विविध यशाचा लेखाजोखा मांडला.
पहिल्यांदाच आयआयटी मुंबईतील हा सर्व दीक्षांत समारंभ आभासी व्यासपीठावर पार पडला. याचा विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे आनंद लुटला. या आभासी सोहळ्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा आभासी अवतार तयार केला गेला होता. ज्यात विद्यार्थी आभासी विश्वात दीक्षांत सभागृहाच्या स्टेजवर जातो आणि मेडल किंवा पदवी स्वीकारतो. अशा प्रकारचे अनोखे तंत्रज्ञान करण्यात आले होते. तंत्रज्ञानाचा वापर करत हा सोहळा संपन्न झाला.