मुंबई- रुग्णाचे अहवाल येण्याच्या आधीच काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोणतेही लक्षणे दिसत असतील तर, लपवू नका. सर्दी, खोकला आणि ताप असल्यास न घाबरता रुग्णालयात जाऊन उपचार घ्या. कोरोना झाला म्हणजे संपले, असे नाही. कारण कोरोना बरा होतो. गंभीर रुग्णांनाही आपण ठणठणीत बरे केलेले आहे. यामध्ये १० महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही हार मानू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राज्यात शनिवारी सायंकाळपर्यंत ६६ हजार ७९६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९५ टक्के चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ३ हजार ६०० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काही जण बरे झाले असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जे रुग्ण सापडत आहेत त्यांना अतिसौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र, अत्यल्प असे लोक आहेत, ज्यांची लक्षणे गंभीर स्वरुपाची आहेत. त्यांना वाचवणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.