मुंबई - मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. काही दिवसात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हॉस्पिटलमधील बेड्स कमी पडल्याने जंबो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. पालिकेने मुंबईत १० ठिकाणी कोविड सेंटर उभारली होती. यातून लाखो रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करून घरी पाठवण्यात आले. मात्र, गेल्या वर्षांपासून कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने पालिकेने एकेक करत कोविड सेंटर बंद केली. (Maharashtra Corona Update) या सेंटरमधील उपकरणे, बेड्स पालिका रुग्णालयात वापर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता.
सध्या ४४३८ बेड्स उपलब्ध - मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात असल्याने दिवसाला १० हुन कमी रुग्णांची नोंद होत आहे. देशात गेल्या काही दिवसात कोरोनच्या बी एफ ७ या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. सध्या पालिकेच्या रुग्णालयात ४४३८ बेड्स उपल्बध आहेत. त्यामधील केवळ ११ बेड्सवर रुग्ण आहेत. इतर सर्व बेड्स रिक्त आहेत.
१७ हजार आणखी बेड्स उपलब्ध होतील - परदेशात वाढलेला कोरोना पाहता मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्यास आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्यासासाठी पालिकेने नियोजन केले आहे. सद्यस्थितीत २ हजार सामान्य बेड, ७७२ आयसीयू, ८५३ व्हेंटिलेटर, चार हजार डॉक्टर, साडेचार हजार नर्स आणि ४५०० आरोग्य कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. गरज लागल्यास केवळ १५ दिवसांतच १० जम्बो कोविड सेंटर सुरू करू त्यात १७ हजार बेड्स उपलब्ध केली जातील अशी माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.