महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मेट्रो 4 चे कारशेडही कांजूरमार्गमध्ये केल्यास वाचतील 7 ते 8 हजार कोटी' - मुंबई शहर बातमी

मेट्रो 4 चे कारशेडही कांजूरमार्गमध्ये केल्यास 7 ते 8 हजार कोटी वाचतील, असे मत याचिकाकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

मेट्रो 4
मेट्रो 4

By

Published : Oct 19, 2020, 4:43 PM IST

मुंबई-कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 च्या कारशेडचा वाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच मिटवला आहे. त्यानुसार मेट्रो 3 चे कारशेड आरेमधून मेट्रो 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) चे कारशेड जिथे बनत आहे तेही कांजूरला हलवले आहे. तेव्हा आता मेट्रो 3 आणि मेट्रो 6 चे एकत्रित कारशेड येथे उभारण्यात येत असतानाच येथे भविष्यात मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) कारशेडही उभारले जाऊ शकते. कारण, मेट्रो-4 चेही कारशेड कांजूर येथे उभारण्याची मागणी मेट्रो 4 भुयारी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य झाली, मेट्रो-4 भुयारी झाली तर ती कासारवडवली-ठाण्यावरून कांजूरला आणून मेट्रो 3 आणि 6 ला जोडल्यास 15 किमीचा मार्ग करण्याची गरज पडणार नाही. यातून 7 ते 8 हजार कोटी रुपये वाचतील, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) कडून सुमारे 15 हजार कोटीचा आणि 32.32 किमीचा मेट्रो 4 प्रकल्प उभारला जात आहे. वडाळा येथून हा मार्ग सुरू होऊन ठाणे-कासारवडवलीला येऊन पुढे गायमुखला जाणार आहे. या मार्गात मूळ 32 आणि दोन विस्तारीत असे 34 मेट्रो स्थानके असून या मार्गासाठी सुमारे 15 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर पूर्णतः उन्नत मेट्रो मार्ग आहे. या प्रकल्पामुळे ठाणेकर काही मिनिटांत मुंबईत पोहचणार आहेत. अशा या प्रकल्पाच्या कामाला एमएमआरडीएकडून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमी आणि काही ठाणेकरांनी जोरदार विरोध केला आहे. मेट्रो 4 उन्नत करण्याऐवजी ती पूर्णतः भुयारी करण्याची मागणी उचलून धरली आहे. पण, या मागणीकडे साफ कानाडोळा करत एमएमआरडीएने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

यानंतर विरोध करणाऱ्यानी आक्रमक भूमिका घेत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सुनावणी सुरू असून पर्यावरणप्रेमी रोहित जोशी हे यातील एक याचिकाकर्ते आहेत. या याचिकेद्वारे मेट्रो 4 भुयारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर या मागणीला न्यायालयाने अनुकुलता दर्शवली तर ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, भुयारी मेट्रो झाल्यास 3000 हुन अधिक झाडे वाचतील. तर अनेक परिसरातील लहान रस्त्यावरून मेट्रो 4 जाणार असून या रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढणार आहे. पण, भुयारी मेट्रो केल्यास हा प्रश्न मार्गी लागेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यापुढे जात आता रोहित जोशी आणि इतर याचिकाकर्त्यांनी मेट्रो 4 भुयारी करत त्याचे कारशेड ठाण्याऐवजी मुंबईत कांजूर येथे मेट्रो 3 आणि मेट्रो 6 बरोबर करावे, अशी मागणी केली आहे.

मेट्रो 4 भुयारी झाल्यास ती गायमूख-कासारवडवली-ठाण्यावरून ती कांजूरला आणावी आणि मग ती मेट्रो 3 आणि 6 ला जोडावी. ज्यामुळे पुढचा वडाळ्यापर्यंतचा 15 किमीचा मार्ग करण्याची गरज लागणार नाही. कारण सध्या मेट्रो 4 पूर्व द्रुतगती मार्गावरून पुढे वडाळ्याला ज्या मार्गे जाणार आहे, त्या मार्गालगत, आसपास मेट्रोचे इतर मार्ग असणार आहेत. मग एकाला लागून एक वेगळ्या मार्गाची गरज नसल्याचे म्हणत जोशी यांनी कांजूर येथे मेट्रो 4 चे कारशेड करत मेट्रोचे एकत्रीकरण करण्याची मागणी केली आहे. यामुळे 15 किमीचा 7 ते 8 हजार कोटीचा खर्च वाचेल, असा दावाही त्यांनी केला आहे.

सद्या मेट्रो 4 चे कारशेड ठाण्यातील मोगरपाडा येथे 35.50 हेक्टर जागेवर बांधण्यात येणार आहे. हा परिसर खाडीपात्र असून येथे दलदल आहे. तर शेकडो भूमीपूत्र येथे शेती करत असून त्यांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे मेट्रो-4 भुयारी करत कांजूरला आणावी. पुढे ती मेट्रो 3, 6 ला जोडावी आणि मेट्रो 4 चे कारशेडही कांजूरमध्येच उभारावे अशी आपली मागणी आहे. ही मागणी आता एमएमआरडीए आणि न्यायालयात ठेवणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा -भांडुपमध्ये 'उत्साही'च्या पुढाकाराने औषध बँक

ABOUT THE AUTHOR

...view details