मुंबई- राज्यात स्थिर सरकार असले पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. यासाठीच राज्यात जर भाजपला वगळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील हिंदवी आणि रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी या मातीतील शिवसेनेने पुढाकार घेतला, तर त्यासाठी राष्ट्रवादी सकारात्मक भूमिका घेईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व आमदार नवाब मलिक यांनी आज 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस उलटले. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापन करण्याचा दावा केला नाही. त्यातच शिवसेनेने यावेळी भाजपच्या विरेाधात खंबीर भूमिका घेतल्याबाबत या विषयी विचारले असता, मलिक म्हणाले की, राज्यात निर्माण होणाऱ्या नवीन पर्यायासाठी आम्ही सकारात्मक आहोत. रयतेचे राज्य निर्माण व्हावे ही राज्यातील नागरिकांची भूमिका आहे. राज्यातील जनतेलाही ते वाटते. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप सेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करायला हवी होती. परंतु तसे झाले नाही. आता भाजपचे काही लोक राज्यात सत्ता स्थापन झाली नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे वक्तव्य करत आहेत, ते चुकीचे आहे. यामुळे राज्यातील जनतेच्या हितासाठी जर काही पर्याय निर्माण होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी प्रयत्न करायला तयार असल्याचे मलिक म्हणाले.
शिवसनेने काय करायचे हे अगोदर ठरवले पाहिजे, त्यानंतर काँग्रेसने निर्णय घेतला तर हा पर्याय लगेच निर्माण होऊ शकतो. ४ तारखेला देशातील प्रश्नावर शरद पवार दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यात राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणारच आहे. त्यानंतर राज्यात वेगळे राजकीय हालचाली हेाऊ शकतात. आम्ही तरीही विरोधक म्हणून भूमिका बजावयाला तयार आहोत. तरीही सेनेला पाच वर्षात भाजपकडून जी अपमानजनक वागणूक मिळाली त्यावरून त्यांचे यावेळी काही वेगळे मत तयार होईल असे वाटत नाही.