मुंबई- केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांचा विमा उतरवल्यानंतर आता राज्य सरकारनेही पुढाकार घेत राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदींसह अर्थ, आरोग्य, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून मुकाबला करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी विभागांना मार्च महिन्याचे उर्वरीत वेतन प्राधान्याने देण्यात यावे, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.