मुंबई -ज्याप्रमाणे राज्यात लॉकडाऊन हळूहळू लागू करण्यात आले, त्याचप्रमाणे आगामी काळात हेच लॉकडाऊन काढण्यात येईल मात्र, नागरिकांनी गर्दी केल्यास पुन्हा सर्व बंद करण्यात येईल, असे इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत संकेत दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले, की कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याच्यावर मात करण्यासाठी सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात गुणाकार करायला लागला आहे. मात्र, कोणीही काळजी करू नये. महाराष्ट्र सरकार तुमची जबाबदारी घेत आहे. ज्याप्रकारे राज्यात हळूहळू आपण सर्व बंद केले तसेच हळूहळू सर्व सुरू करू. तसेच आता लॉकडाऊन हा शब्द आता बाजूला करा. हळूहळू सर्व सुरळीत करणार. मात्र, जनतेने खबरदारी घेतली नाही तर पुन्हा बंद करणार, असेही ते म्हणाले.