मुंबई -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच गाजणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याची भूमिका भाजपने घेतली आहे. संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी राजीनामा घेणार, असे बोललं जात आहे. मग हे सरकार कशाची वाट पाहत आहे? संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नसल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले.
याबाबत बोलताना भाजप नेते अतुल भातखळकर. बेशरमपणाचा कळस -
संजय राठोड 15 दिवस फरार होते. आता ते शक्तीप्रदर्शन करत आहेत. मात्र, हे करून काहीही होणार नाही. त्यांची आजची अवस्था म्हणजे 'सामना'मधल्या भेदरलेल्या सरपंचसारखी झाली आहे. निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो, हे संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसते, अशी टीका भातखळकर यांनी केली. तर महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्यांना संरक्षण देणारे हे सरकार असल्याचे टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा -आज व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप, देशातील मालवाहतूक वाहनांचाही 'चक्काजाम'
मुख्यमंत्री हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्यही संजय राऊत यांनी केलं आहे.