आज बाळासाहेब ठाकरे असते तर? 'अशी' असती शिवसेना!
बाळासाहेबांनी सुरुवातीपासूनच भाजपवर अंकूश ठेवला होता. भाजप वरचढ होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. बाळासाहेबांपुढे बोलण्याची किंवा त्यांना विरोध करण्याची कोणत्याही भाजप नेत्याची टाप नव्हती. भाजप नेते कुरकुर करू लागताच त्यांचा उल्लेख 'कमळा बाई' असा थेट ते करत होते.
मुंबई -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे राजकारणातील झंझावात. दरारा असावा तर तो बाळासाहेब ठाकरेंसारखा. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात ठाकरे शैलीची त्यांनी एक वेगळी छाप पाडली होती. युतीच्या राजकारणात बाळासाहेबांचा शब्द हाच अंतिम असायचा. पण आत्ता स्थिती बदलली असून फ्रंट फुटवर राहणारी शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असा आरोप विरोधक करतात. भाजप शिवसेनेला आपल्या मागे फरफटत नेत असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यातूनच बाळासाहेब आज असते तर? हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
बाळासाहेबांनी सुरुवातीपासूनच भाजपवर अंकूश ठेवला होता. भाजप वरचढ होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. बाळसाहेबांपुढे बोलण्याची किंवा त्यांना विरोध करण्याची कोणत्याही भाजप नेत्याची टाप नव्हती. भाजप नेते कुरकुर करू लागताच त्यांचा उल्लेख 'कमळा बाई' असा थेट ते करत. अशा वेळी भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांची धावपळ होत असे. महाजन-मुंडे जोडी बाळासाहेबांची मनधरणी करून त्यांना शांत करायचे. युतीबाबत कोणताही निर्णय घ्यायचा झाली तर तो मातोश्रीवरून होत असे. भाजपचे सर्व नेते मातोश्रीवर जात होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणींपासून सर्व नेते मातोश्रीवर जात होते.
युती असली तरी बाळासाहेबांचे काही निर्णय हे त्यांचे स्वत:चे असायचे. त्यात ते कोणतीही तडजोड करत नव्हते. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ऐनरॉन प्रकल्प आणलाय. त्याला भाजप नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपिनाथ मुंडे यांनी जोरदार विरोध केला होता. शिवाय सत्तेत आल्यास ऐनरॉन अरबी समुद्रात बुडवू अशी घोषणा दिली होती. ९५ ला युतीचे सरकार आले. मुंडेंकडे उर्जा खाते होते. मुख्यमंत्री शिवसेनेचे मनोहर जोशी होते. त्यावेळी बाळासाहेबांच्या आदेशानेच दाभोळचा ऐनरॉन प्रकल्प कायम ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भाजपला गणतीत धरलेच नाही. धडक निर्णय घ्यायला जोशींनी भाग पाडले. यावेळी भाजपची मोठी कोंडी झाली होती. मात्र, ते बाळासाहेबांच्या पुढे जाऊ शकले नाही. ऐवढा दरारा बाळासाहेबांचा होता.
२००७ च्या राष्ट्रपती निवडणुकीतही बाळासाहेबांनी आपला इंगा भाजपला दाखवला होता. काँग्रेसने मराठमोळ्या प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने भैरवसिंग शेखावत यांना रिंगणात उतरले होते. शिवसेना भाजपचा मित्रपक्ष असल्याने शिवसेनेचा पाठींबा भाजपने गृहीत धरला होता. पण तिथेही बाळासाहेबांनी भाजपला धक्का दिला होता. त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर काँग्रेस उमेदवाराला पाठींबा दिला होता. तेव्हा अडवाणींची स्थिती केविलवाणी झाली होती. त्यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण बाळासाहेब आपल्या निर्णयावर ठाम होते. असाच दणका त्यांनी भाजपला प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठींबा देवून दिला होता.
बाळासाहेबांचा धडाका असा होती की त्यापुढे कोणाचेही काही चालत नसे. बाळासाहेब आज असते तर त्यांना कधीही भाजपच्या मागे फरफटत जाणे पसंत पडले नसते. त्यांनी बेधडक युती तोडली असती असे राजकिय विश्लेशक सांगतात. आत्ता जी स्थिती शिवसेनेवर आली आहे मुळात तीच त्यांनी येवू दिली नसती. राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ यावर ते ठाम राहीले असते त्यांनी कधीही तडजोड केली नसती. जरी भाजपच्या जागा जास्त आल्या असत्या तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता. तेवढी धमक बाळासाहेबांत होती. त्यांच्या स्वभावा नुसार त्यांनी युतीत दुय्यम स्थान पत्करले नसते. गरज पडल्यास ते विरोधीपक्षात बसले असते असेही राजकीय विश्लेशक सांगतात.