मुंबई- मोठ्या राजकीय घडामोडींनंतर भाजप व सेनेच्या युतीचे घोडं गंगेत न्हालं. परंतु या दोन पक्षांमध्ये धुसफूस अजूनही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. जर भाजपला ठरलेल्या प्रस्तावानुसार अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मान्य नसेल तर युती तोडून टाकावी, असे स्पष्ट मत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे. पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा युती नसलेलीच बरे, असेही ते म्हणाले.
कदम म्हणाले, की २००१ साली युती असताना बहुतांश मतदार संघामध्ये जेथे शिवसेनेचे उमेदवार होते तेथे कोऱ्या मतपत्रिका आढळून आल्या. ५ हजारांपासून ३० हजारापर्यंत कोऱ्या मतपत्रिका आढळल्या. त्यामुळे पाडापाडीचे राजकारण करण्यापेक्षा युती नसलेली बरे, असे ते म्हणाले.मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेते महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा रामदास कदम यांनी चांगलाच समाचार घेतला. युतीमध्ये अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब झाले आहे. याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी घ्यावी. उगाच चंद्रकांत पाटील यांनी युतीत मिठाचा खडा टाकू नये, असेही कदम म्हणाले. गेल्या निवडणुकीत अधिक आमदार निवडणून येण्यासाठी युतीत पाडापाडीचे प्रयत्न झाले, असे पुन्हा होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ वाटून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे दोन्ही पक्षात निश्चित झाले आहे. अर्धवट माहितीच्या आधारे चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य करू नये. पाटील यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलून पुन्हा एक पत्रकार परिषद घ्यावी, असेही रामदास कदम म्हणाले.नाणार प्रकल्पाबाबत बोलताना कदम यांनी सांगितले की, नाणार प्रकल्प रद्द करण्याचा बोलीवर युतीचे शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. जमीन संपादनाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते आधी हा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.