महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत इडली-वडा विकणाऱ्यांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ

चकाकणारे अ‌ॅल्यूमिनियमचे मोठे पातेले, आणखी एखादे भांडे, डबा, पिशवी हे सगळ डोक्यावर, सायकलवर आणि गाड्यांवर घेऊन रोज मुंबईतील लोकांची भूक भागवणारा ईडली, मेदूवडा, डोसावाला या लॉकडाऊनमध्ये दिसेनासा झाला आहे. ईडलीवाल्यांवर कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

Mumbai Idli-Vada sellers financial crisis news
मुंबईत इडली-वडा विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे

By

Published : Apr 27, 2021, 8:44 AM IST

मुंबई - गेल्या वर्षभरापासून कोरोनाने भारतभर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस मुंबईतील धारावी परिसरात अनेक गल्ल्याबोळ्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये विशेषतः धारावीमध्ये अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांचा रोजगार गेला होता. आता पुन्हा तीच परिस्थिती दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये उद्भवलेली आहे. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर गाड्यांवर इडली-वडा विकणारे व्यवसायिकांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली आहे. रोज हातावर पोट असणाऱ्यांना या व्यावसायिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. यासंदर्भात सरकार विचार करणार आहे का? असा सवाल आता हे व्यावसायिक उपस्थित करत आहेत.

मुंबईत इडली-वडा विकणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे

शेकडो व्यावसायिक बेरोजगार -

धारावी परिसरातील 90 फुट रस्त्यावरील लक्ष्मीचाळ ही सगळ्या मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे. या चाळीमध्ये इडली-वडा यांसारखे नाश्त्याचे पदार्थ बनवून ते मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर विकणारे व्यावसायिक राहतात. त्यांची संख्या दोनशे ते तीनशे इतकी आहे. त्या सगळ्या व्यावसायिकांवरती दुसऱ्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर जगावे की मरावे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आभाळ कोसळल्यागत परिस्थिती -

'गेल्या वीस वर्षांपासून माहीम परिसरामध्ये सकाळी नाश्त्यासाठी मी हा इडली-वडा विकण्यासाठी जातो. गेल्या वीस वर्षांच्या माझ्या आयुष्यात मी असा प्रसंग पहिल्यांदा अनुभवतो आहे. गेल्या वर्षभरापासून माझा हा व्यवसाय रखडलेला आहे. माहीम परिसरामध्ये माझे एक छोटेखानी दुकान आहे. त्या दुकानाला आठ हजार रुपये भाडे आहे, त्याचे वीज बिल आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. गेल्या वर्षभरापासून माझे दुकान बंद आहे. मध्यंतरी काही दिवस व्यवसाय केला मात्र, तो पूर्वीसारखा समाधानकारक झाला नाही. आता पुन्हा दुसरा लॉकडाऊन लागला आहे. आमची तर पूर्ण कंबरच मोडली गेली आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा वीज बिल माफ करणार किंवा वीज बिल कमी करणार, अशा घोषणा झाल्या मात्र, त्यातील कोणतीच घोषणा पूर्ण झाली नाही. गेल्या वर्षभरामध्ये दुकानात 50 हजार रुपयांचे विजबिल आले. तेही नाईलाजास्तव भरावे लागले. मुलांचे शिक्षण, आमच्या घरचा खर्च, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत आणि घरात कमावणारा मी एकटा आहे. हे सर्व मी कसे सांभाळणार? माझ्यापुढे तर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे', अशी दुःखदायक प्रतिक्रिया लक्ष्मी चाळीमध्ये राहणाऱ्या श्रवणकुमार यांनी दिली.

या लहान-लहान व्यावसायिकांसमोर सध्या खूपच बिकट परिस्थिती उद्भवलेली आहे. सरकारने यासंदर्भात त्यांचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ थोडीफार आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणी हे छोटे व्यावसायिक करत आहेत.

हेही वाचा -LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ABOUT THE AUTHOR

...view details