महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारच्या नाकावर टिच्चून 'आयसीटी'ने सुरू केल्या अंतिम वर्षांच्या परीक्षा - uday samant news

मुंबई आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने राज्यातील सर्वच अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, आयसीटीला यासाठी कोणती घाई होती, असा सवाल करत त्यावर युवासेनेपासून इतर विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतले आहेत. यासाठी सररकारने तातडीने आयसीटीवर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले आहे.

सरकारच्या नाकारवर टिच्चून 'आयसीटी'ने सुरू केल्या अंतिम वर्षांच्या परीक्षा
सरकारच्या नाकारवर टिच्चून 'आयसीटी'ने सुरू केल्या अंतिम वर्षांच्या परीक्षा

By

Published : Jul 2, 2020, 7:57 PM IST

मुंबई :राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बिघडलेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केल्या. अशा स्थितीतच सरकारच्या नाकावर टिच्चून मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, (आयसीटी)ने आपल्याकडील अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरू केल्या आहेत. यासाठी आयसीटीने आपली संस्था ही स्वायत्त असल्याचा दावा करत ही परीक्षा सुरू केली आहे. आपण कोणत्याही प्रकारने विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात वर्गात बसवून ही परीक्षा घेत नाही तर त्यासाठी आम्ही ई-एक्झामच्या आधारे ही परीक्षा राबवत असल्याची माहिती आयसीटीचे कुलगुरु डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

मुंबई आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने राज्यातील सर्वच अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर, आयसीटीला यासाठी कोणती घाई होती, असा सवाल करत त्यावर युवासेनेपासून इतर विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतले आहेत. यासाठी सररकारने तातडीने आयसीटीवर कारवाई करावी अशी मागणी करणारे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले आहे. आयसीटीमध्ये केमिकल इंजिनिअरिंग, फार्मसी, फिजीक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या विषयांवरील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीचे अभ्यासक्रम चालतात. यातील केवळ अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन मते मागविण्यात आली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने आपण ही परीक्षा घेत असल्याचेही कुलगुरू डॉ. पंडित यांनी सांगितले.

ही परीक्षा आम्ही ई-एक्झाम या सिस्टमद्वारे घेत असून त्यातून मागील दोन दिवसांत एकही तक्रार आली नाही. विद्यार्थ्यांना आपल्या घरूनच ही परीक्षा देता येते. त्यातही काही अडचण निर्माण झाल्यास आम्ही पुढील दोन महिन्यानंतर यासाठी आणखी एक परीक्षा घेणार आहोत. शिवाय नापास झालेल्यांना ऑगस्टनंतर तिसरी परीक्षाही घेतली जाणार असल्याची माहितीही कुलगुरूंनी दिली. सध्या सुरू असलेल्या परीक्षेत केमिकल इंजिनिअरिंगच्या सात शाखांसोबत फार्मसी आणि इतर शाखांचे मिळून एकूण ४५ पेपर घेतले जाणार आहेत. पुढील पाच दिवस ही परीक्षा चालणार असल्याची माहितीही कुलगुरुंनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details