मुंबई : आयसीसी पुरुषांचा एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात आयोजित केला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमपासून 5 ऑक्टोबरला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. विश्वचषक 2023 मध्ये, भारत 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता भारतातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान कोणत्या दिवशी भिडणार हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
भारताचे वेळापत्रक : या विश्वचषकात भारत साखळी फेरीत एकूण 9 सामने खेळणार आहे. भारतीय संघ 8 ऑक्टोबरला चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारताचा दुसरा सामना 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाचा चौथा सामना बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबरला पुण्यात होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचवा सामना 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला मैदानावर होणार आहे. भारताचा सहावा सामना 29 ऑक्टोबरला लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. भारताचा क्वालिफायर सामना 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. याशिवाय 5 नोव्हेंबरला कोलकाता येथे भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी भारत बंगळुरू येथे क्वालिफायर 1 खेळणार आहे.