मुंबई ICC Cricket World Cup 2023: भारतात सध्या सुरू असलेली क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा ही अंतिम टप्प्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) या दोन संघात मुंबईतील वानखेडे स्टेडीयम (Wankhede Stadium) येथे सेमी फायनलचा सामना रंगणार आहे. स्टेडीयमधून प्रत्यक्ष मॅच पाहण्याकरता देश विदेशातील क्रिकेट प्रेमी उत्सुक आहेत. त्यांना बुक माय शो या पोर्टलवर मॅचची तिकिटे उपलब्ध केलेली आहेत. ११ नोव्हेंबरला गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, आकाश कोठारी हा त्याचे राहते घर मालाड येथून १५ नोव्हेंबरच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या सेमी फायनल सामन्याची तिकीटे, त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा चार ते पाच पटीनं वाढीव किंमतीने क्रिकेटप्रेमींना विकणार आहे. तसंच क्रिकेट वर्ल्ड कप तिकीटांचा काळाबाजार करून क्रिकेट सामन्याच्या आयोजकांची तो फसवणूक करीत आहे. याप्रकरणी त्याला सर जे जे मार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिकिटांची ब्लॅक विक्री :परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, वर्ल्ड कप भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या वानखेडे स्टेडियम होणाऱ्या क्रिकेट सामान्याच्या तिकिटांची काळ्या बाजारात विक्री काही जण करत आहेत. या माहितीच्या अनुषंगाने अधिक चौकशी करून आकाश कोठारी (वय ३०) याला सर जे जे मार्ग पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलं.