मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सनदी अधिरकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच आहे. आजही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी नियुक्ती केलेल्या तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीचा तिढा कायम आहे.
तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच हा बदली आदेश रद्द करण्यात आला आहे. मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. निंबाळकर हे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.