मुंबई : ईडीने 21 जूनला ईडीने 15 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण व संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवर छापे टाकले. या छापेमारीनंतर आयएएस अधिकारी संजीय जयस्वाल यांना चौकशीसाठी समन्स बजाविले. गुरुवारी त्यांची चौकशी देखील झाली. या दरम्यान बुधवारी टाकलेल्या छापेमारीत ईडीला 150 कोटींची स्थावर मालमत्ता सापडली आहे. या 150 पैकी 100 कोटींची मालमत्ता ही आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या नावावर असल्याचा दावा आता केला जात आहे.
ईडी लवकरच संजय जयस्वाल यांना दुसरे समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहे. जयस्वाल यांनी ईडीकडे चार दिवसांचा वेळ मागितला आहे. याचबरोबर ईडी लवकरच डॉ. हरिदास राठोड, रमाकांत बिरादार आणि इतरांना समन्स पाठवणार आहे. त्यांचे जबाब नोंदवणार आहे. पुढील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलावणार आहे. कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत महापालिका आयुक्त होते. संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्षात फक्त 34 कोटी मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. यासोबत ही मालमत्ता त्यांच्या सासऱ्याने भेट दिल्याचे स्पष्टीकरण दिले. यासोबत 15 कोटी रूपयांच्या एफडी देखील सासऱ्याने भेट स्वरूपात दिल्याची माहिती दिल्याचा दावा केला आहे. याबाबत ईडीकडून अधिक सखोल तपास सुरू आहे.
संजीव जयस्वाल यांच्या परवानगीने कामांना मंजुरी:कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी 15 हून अधिक ठिकाणी छापांचे धाडसत्र केले होते. या छाप्यातील एक ठिकाण संजीव जयस्वाल यांचे वांद्रे पूर्व येथील घर होते. संजीव जयस्वाल हे सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आहेत. कथित कोविड सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महापालिकेत अतिरीक्त महापालिका आयुक्त होते. त्यांच्या परवानगीने कोव्हिट सेंटरची कामे मंजुर झाल्याने त्यांची देखील चौकशी सुरू आहे.