मुंबई - शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडीने) शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आज शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला.
पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली होती. आजही मोठ्या संख्य़ने कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर होते.
शरद पवार आज दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात जाणार असल्याने कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या परिसरात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या ईडी कार्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.