राम मंदिराच्या संघर्षाविषयीचा अनुभव सांगताना कारसेवक शालिनीताई डबीर आणि दिलीप गोडांबे मुंबईShalinitai Dabir :येत्या 22 तारखेला अयोध्येत राम जन्मभूमी येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे. कोट्यवधी भारतीयांचं श्रद्धास्थान (Ram Janmabhoomi) असलेल्या श्रीरामाच्या मंदिराच्या लोकार्पणानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, हे मंदिर निर्माण होण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, अशोक सिंघल यांच्या नेतृत्वाखाली सोमनाथ पासून कारसेवा सुरू झाली आणि ती अयोध्येपर्यंत नेण्यात येणार होती.
कारसेवेला तत्कालीन यूपी, बिहार सरकारचा विरोध :अयोध्येत रामजन्मभूमीवर राम मंदिर निर्माण करावं या मागणीसाठी कारसेवक रथयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत होते. केंद्र आणि उत्तर प्रदेश, बिहारची राज्य सरकारं मात्र या रथयात्रेला, कारसेवेला विरोध करत होते; पण तरीही या रथयात्रेत हजारो कारसेवक सहभागी झाले. महाराष्ट्रातूनही शेकडो लोक कारसेवक म्हणून रवाना झाले. त्यातच होत्या 63 वर्षीय शालिनीताई डबीर.
कोण आहेत शालिनीताई -मुंबईतील दादर या गजबजलेल्या परिसरात ९६ वर्षीय शालिनीताई डबीर आजही राहतात. 1990 मध्ये राम जन्मभूमी शिलान्यास आंदोलन असेल किंवा 1992 मध्ये निघालेली रथयात्रा असेल या दोन्ही प्रसंगी शालिनीताई यांनी अत्यंत हिरीरीनं आणि उत्साहानं यात भाग घेतला. प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असलेल्या जागेसाठी संघर्ष करावा लागला, लढावं लागलं तरी चालेल या विचारानेच अनेक कारसेवक या रथयात्रेत सहभागी झाले होते. त्यापैकी एक मी होते, असं सांगताना शालिनीताई जुन्या आठवणींना उजाळा देतात.
अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या, गोळीबार झाला :1992 मध्ये जेव्हा रथयात्रा सुरू होती तेव्हा आम्ही महाराष्ट्रातून काही महिला आणि पुरुष सामील झालो होतो. आम्हाला उत्तर प्रदेशात एके ठिकाणी अडवण्यात आलं. पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांना जुमानत नव्हतो. मग त्यांनी आम्हाला उचलून गाडीत कोंबलं. पोलीस आम्हाला दूर जंगलात नेऊन सोडणार होते. पोलिसांच्या बोलण्यावरून हे माझ्या लक्षात येताच मी लघुशंकेच्या निमित्तानं गाडी थांबवायला सांगितली. खाली उतरून जेव्हा मी आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना दिली तेव्हा लोकांनी ताबडतोब दुकानं बंद केली आणि सर्व रस्त्यावर उतरले. ते वातावरण खूप भारलेलं होतं. त्यामुळे आम्हाला लोक मोठ्या प्रमाणात मदत करत होते.
अन् शालीनीताईंचे डोळे पाणावले :पोलीससुद्धा आमच्या बाजूने होते. मात्र सरकारी आदेशापुढे त्यांचं काही चालत नव्हतं. कारसेवक आता ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी फैजाबाद जवळ अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि गोळीबार केला. माझ्या बाजूने गोळी गेली मी बचावले; मात्र अश्रूधुरामुळे मला काही दिसत नव्हतं. मला वाटलं मी आता ठार आंधळी झाले; कारण दोन दिवस मला काहीच दिसत नव्हतं. आम्ही जिथं होतो तिथं अचानक गोळीबार सुरू झाला. काहीच समजत नव्हतं. नेमकं काय घडत आहे. माझ्या बाजूनं गोळी गेली मी सुदैवाने बचावले, हे सांगताना शालिनीताईंचे डोळे पाणावले.
आणि रामाचं दर्शन झालं :शालिनीताई डबीर पुढे सांगतात की, ''रथयात्रेत संघर्ष करत आणि मिळेल ते खात आम्ही अखेर अयोध्येत पोहोचलो. मात्र तिथे प्रचंड बंदोबस्त होता. आम्हाला तिथपर्यंत जाऊ दिलं जात नव्हतं. आम्ही कसेबसे तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर अखेर ती भिंत पाडली आणि भिंतीच्या मागे प्रभू रामचंद्रांच्या, लक्ष्मणाच्या, सीतेची मूर्ती दिसल्या. त्यांचे वस्त्र अलंकार दिसले सर्व अतिशय व्यवस्थित आणि सुस्थितीत होतं. ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला. एवढ्या दिवसाच्या संघर्षाचं सार्थक झालं, असे चेहऱ्यावर अतिशय समाधानाचे भाव आले.''
जीवनाचं सार्थक झालं :येत्या 22 जानेवारीला अखेर अयोध्येत राम मंदिर लोकार्पण कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाचं निमंत्रण मला मिळालं. मात्र माझ्या वयोमानानुसार मला जाता येत नाही. परंतु, ज्यासाठी आपण संघर्ष केला, लढलो त्या प्रभू रामचंद्राचं अखेर मंदिर तयार होतं आहे, यानं आम्हाला खूप आनंद झाला आहे. जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं वाटतं. आता मला कानानं ऐकू येत नाही. मात्र, डोळ्यातून अधून मधून पाणी येत असलं तरी ह्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे. लवकरच मी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी अयोध्येत नक्की जाईन अशी इच्छा व्यक्त करताना शालिनीताई अतिशय भावुक होतात.
हेही वाचा:
- आव्हाडांनी संस्कृत वाचलं नसेल, अर्थाचा अनर्थ केला; कथाकार अनिरुद्धाचार्य यांची टीका
- मोदी विष्णूचे 13 वे अवतार असतील तर मग बॅलेट पेपरला का घाबरता?, संजय राऊतांचा हल्लाबोल
- नाट्य संमेलन : नाट्य दिंडीने दुमदुमलं पुणे, कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद