मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिन स्फोटके सापडली होती. यासंदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असून याप्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. १७ जून रोजी मुंबई पोलीस खात्यातील माजी एन्काऊंटर फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यानां सुद्धा याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याची रवानगी १२ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे. यावेळी एनआयए कोर्टात प्रदीप शर्मा यांच्या वकिलांनी त्यांचा सचिन वाझे व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे.
एनआयएची चौकशी तूर्तास पूर्ण; शर्मांना १२ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी -
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यास या अगोदरही राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र प्रत्येक वेळेस त्याने त्याच्या दिलेल्या जबानीत त्याचा हिरेन मनसुख हत्येप्रकरणी कुठलाही संबंध नाही. तसेच सचिन वाझेशी त्याचे घेणे-देणे नसल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशी पथकाला सांगत आले आहेत. आणि हेच त्याने एनआयए कोर्टात सुद्धा त्याच्या वकिलामार्फत म्हणून दाखवल आहे. मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार हिरेन मनसुख यांची ४ मार्च रोजी ठाण्यात हत्या करण्यात आलेली होती. त्या वेळेस संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष सोनी, बडतर्फ पोलिस अधिकारी सुनील माने व सचिन वाझे, सतीश मोटूकुरी हे आरोपी प्रदीप शर्मा याच्यासोबत संपर्कात होते.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार, याप्रकरणी हिरेन याच्या हत्येसंदर्भात आतापर्यंत जो काही तपास करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रदीप शर्मा याचा सहभाग असून त्याची चौकशी पूर्ण झालेली असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटलेले आहे. एनआयएची चौकशी तूर्तास पूर्ण झाल्याचं स्पष्ट झाल्याने न्यायालयाने त्याची रवानगी १२ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.