मुंबई -मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्या व्हायरल व्हिडिओत कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्यावर शुक्रवारी (दि. 12) एक शस्त्रक्रिया होणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील, असे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यत आले आहे. तसेच समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मणक्यात आणि मानेमध्ये त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील एच.एन.रिलायन्स फाऊंडेशन या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर उद्या (शुक्रवार) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कोरोनाकाळात आलेल्या कामाच्या भारामुळे आपल्या तब्येतीकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, राज्यातील जनतेला काल (बुधवार) एक भावनिक संदेश त्यांनी दिला.