मुंबई- शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोसिन शेख यांच्यावर बुधवारी रात्री तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. स्थानिकांनी मोसिन शेख यांना जखमी अवस्थेत झेन रुग्णालयामध्ये दाखल केले. चाकू, तलवारीने हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
मुंबईत राष्ट्रवादीच्या नगरसेविका नादिया शेख यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोसिन शेख यांच्यावर बुधवारी रात्री तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला.
नादिया शेख देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक १४० च्या नगरसेविका आहेत. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मोसिन शेख यांची प्रकृती स्थिर आहे. हल्ल्याची बातमी कळताच राष्ट्रवादी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मोसिन शेख यांच्या तब्येतीची विचारपूस केली. हा हल्ला राजकीय हेतूने झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
संवेदनशील समजल्या जाणाऱ्या देवनार परिसरात घडलेल्या या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट असून निवडणुकीच्या काळामध्ये हा हल्ला झाल्यामुळे या घटनेला राजकीय वळण मिळत आहे.