मुंबई :योगा क्लास बंद करण्यावरुन पतीसोबत झालेल्या वादानंतर रागाच्या भरात एका 39 वर्षांच्या महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. विशेष म्हणजे महिलेला मृत घोषित केल्यानंतर ही केस आत्महत्येची असतानाही स्थानिक खाजगी हॉस्पिटलमधून ही माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. तसेच महिलेच्या पतीने तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केल्याने या घटनेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला : या घटनेची समतानगर पोलिसांनी दखल घेतली असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. ही महिला तिचा पती व 13 आणि 7 वर्षांच्या दोन मुलींसोबत कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, एन. जे सनसिटी अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती तिच्या राहत्या घरी योगाचे क्लास घेत होती. पत्नीने घरात योगाचे क्लास घेणे पतीला पसंद नव्हते. त्यामुळे त्याने तिला क्लास बंद करण्यास सांगितले. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्यावरुन त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु होता. शनिवारी याच कारणावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात महिलेने विषारी किटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडातून फेस येऊ लागताच पती घाबरला आणि त्याने तिला जवळच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.