मुंबई- बेस्ट उपक्रमाकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुखद प्रवासासाठी तेजस्विनी बसेस चालवल्या जात आहेत. आता महिला प्रवाशांना बेस्ट बसेसमध्ये प्रथम प्राधान्य देण्याबरोबरच आता 'लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल' बसेस महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. शनिवारी (6 नोव्हेंबर) 100 लेडीज स्पेशल बसेस सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिवाळी भेट देऊन महिला प्रवाशांना दिलासा दिला आहे.
महिलांसाठी विशेष बससेवा
मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून बेस्ट बसेसची ओळख आहे. बेस्ट बसेसने दररोज 27 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट बसेसमध्ये महिला प्रवाशांना प्रथम प्राधान्य देण्यात येते. महिला प्रवाशांचा प्रवास सुखद व सुरक्षित व्हावा यासाठी आता भाऊबीज निमित्ताने महिला प्रवाशांना मुख्यमंत्र्यांनी अनोखी भेट देत 100 'लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल' शनिवारपासून सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बेस्ट उपक्रमाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बेस्ट उपक्रमाच्या 27 बस आगारातून 100 बस मार्गावर 'लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल' बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या बसेसमध्ये 90 बसेस वातानुकूलित असणार आहेत.
महिला स्पेशल गाड्या वाढविण्याचा निर्णय
बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली असून कार्यालयीन वेळांमध्ये सकाळी व सायंकाळी बेस्ट बसगाड्यांमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू लागले आहेत. त्यात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट उपक्रमाकडून महिला प्रवाशांसाठी विशेष बस फेऱ्या चालविल्या जातात. नोव्हेंबर, 2019 पासून महिलांसाठी आरक्षित बस 'तेजस्विनी' नावाने टप्प्याटप्यात ताफ्यात येऊ लागल्या. आजघडीला साधारण 37 'तेजस्विनी' धावत आहेत. सकाळी ८ ते सकाळी साडेअकरा आणि दुपारी साडेचार ते रात्री 8 या वेळेत महिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी' चालविण्यात येत होत्या. पण, मुंबईत कोरोनाचा कहर झाल्यानंतर महिलांची संख्याही कमी झाली होती. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने बेस्ट बसमधील प्रवाशांची गर्दी आता पूर्वीप्रमाणे वाढली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने महिला स्पेशल गाड्यांची संख्याही वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून महिला प्रवाशांसाठी लेडिज स्पेशल बस सुरु केली जाणार आहे. सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या 37 महिला स्पेशल बस धावतात. त्यात या 100 बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या 137 होणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा -औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी साधला संवाद.. लसीकरणाबाबतची दिली माहिती