मुंबई : पत्राचाळीतील रहिवाशीयांनी म्हाडा, रेरा आणि राज्य सरकारकडे दाद मागितली. पण, न्याय न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. आज (रविवारी) पत्राचाळीत भाजप खासदार गोपाळ शेट्टी आले आणि हा प्रश्न समजून घेत सदनिका धारकांना लवकरात लवकर घर मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ज्या अधिकाऱ्यांमुळे विलंब झाला त्यांच्यावरही कारवाही करण्याची मागणी खासदार शेट्टी यांनी दिली. आम्ही रजिस्ट्रेशन फी आणि बिल्डरला पैसेही दिले. पण, अद्यापही फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. तो लवकरात लवकर मिळावा अशी मागणी संबंधित ग्राहकांनी केली. त्यासाठी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आंदोलकानी सांगितले. मुंबईतील पत्राचलमध्ये राहणाऱ्या लोकांना आणि फ्लॅटधारकांना १५ वर्षानंतरही घर मिळालेले नाही.
ग्राहकांचा मूक आंदोलनाचा इशारा :पत्राचाळच्या बिल्डरकडून ज्यांनी 10 वर्षांपूर्वी सदनिका विकत घेतल्या होत्या, ते मानवी साखळी करून बिल्डर आणि सरकारविरोधात मूक आंदोलन करणार आहेत. या निदर्शनात खासदार गोपाळ शेट्टी, खासदार गजानन कृतीकर यांच्यासह हजारो लोक सहभागी होणार आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी इमारतीला ओसी न मिळाल्याने हजारो लोक बिल्डरच्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवत आहेत. हे लोक अनेक दिवसांपासून कर्जाचे हप्ते भरत आहेत; पण आम्हाला सरकारकडून कोणताही दिलासा मिळत नाही.
काय आहे प्रकरण ?गोरेगावमधील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) ४७ एकरांवर पसरले आहे. यामध्ये ६७२ कुटुंबे भाड्याने राहतात. 2008 मध्ये, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) या सरकारी संस्थेने चाळीच्या पुनर्विकासाचे कंत्राट गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (GACPL), हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) च्या उपकंपनीला दिले. जीएसीपीएलने भाडेकरूंसाठी ६७२ फ्लॅट तयार करायचे होते. यापैकी काही फ्लॅट म्हाडालाही द्यायचे होते. उर्वरित जमीन खासगी विकासकांना विकता आली असती; परंतु गेल्या 14 वर्षांत भाडेकरूंना एकही फ्लॅट मिळालेला नाही. कारण कंपनीने पत्राचाळचा पुनर्विकास केला नाही आणि जमिनीचे पार्सल 1,034 कोटी रुपयांना इतर बिल्डरांना विकले, असे ईडीच्या म्हणण्यानुसार माहिती.