महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात, १५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा - hsc students

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात २१ फेब्रुवारीपासून होत आहे. या परीक्षेला राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी आहेत.

girl

By

Published : Feb 20, 2019, 11:22 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात २१ फेब्रुवारीपासून होत आहे. या परीक्षेला राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी तर ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थिनी आहेत.

राज्यभरात असलेल्या एकूण ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयातील हे विद्यार्थी असून यांची परीक्षा राज्यभरातील २९५७ परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. या बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत. यात ५ लाख ६९ हजार ४७६ विद्यार्थी या शाखेचे आहेत. तर उर्वरित शाखांमध्ये ८ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेचे सर्वात कमी असे, कला शाखेचे ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थी आहेत.

किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या (व्होकेशनल) मधील ५८ हजार ०१२ विद्यार्थ्यांचाही या परीक्षेत समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून या परीक्षेसाठी ९ भाषा विषयांची कृतीपत्रिका तयार करण्यात आलेली आहे तसेच यावेळी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिका आराखडा बदललेला आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी होण्यासाठी या बारावी परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. तर परीक्षेच्या दरम्यान विषयाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक भोसले यांनी दिली.

बारावीच्या परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमध्ये हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध प्रश्न आणि अडचणी यावर माहिती दिली जाणार आहे.

बारावीच्या परीक्षेत यंदाही इंग्रजी विषयाची बहुसंची प्रश्नपत्रिका लागू करण्यात आली आहे. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना गणित विषय आणि पुस्तपालन लेखाकर्म विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयाच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हा कॅलक्युलेटर विद्यार्थ्यांनी स्वतःचा आणावा असे ही मंडळाने स्पष्ट केले आहे. तर कॅलक्युलेटर स्वरूपातील मोबाईल वापरता येणार नसल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा म्हणून मंडळाकडून संपूर्ण राज्यात २५२ भरारी पथक नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून विशेष महिला भरारी पथक विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी तसेच केंद्राच्या परिसराचे विद्युतीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना मंडळाकडून करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details