मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात मुंबई क्राइम ब्रांच अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आणखीन काही जणांची अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तब्बल 17 वर्षे मुंबई पोलीस खात्यातून निलंबित राहणाऱ्या सचिन वाझे यांना अचानक मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा कसे सामावून घेण्यात आले हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
2002 घाटकोपर बॉम्ब ब्लास्ट संदर्भात अटक करण्यात आलेला परभणी येथील सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूस यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांना 3 मार्च 2004 रोजी सीआयडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते. यानंतर वाझे यांनी त्यांचे काही पॉलिटिकल कनेक्शन वापरून पुन्हा पोलीस खात्यात येण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी झाला होता. 2008 मध्ये सचिन वाझे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून काही पदांवर काम सुद्धा केले होते व त्यानंतर 6 जून 2020 मध्ये त्यांची मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा वर्णी लागली.
पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला निर्णय -
5 जून 2020 रोजी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पोलीस खात्यात निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील विचार-विनिमय करणाऱ्या समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीदरम्यान सचिन वाझे यांना कोरोना संक्रमण सुरू असल्यामुळे पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात यावे, असे आदेश पारित करण्यात आले होते. 6 जून 2020 रोजी तशा प्रकारचे परीपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये सचिन वाझे यांना या आदेशाची प्रत पाठवण्यात आली होती. या परिपत्रकानुसार 6 जून 2020 रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात येत असून त्यांना हत्यारी पोलीस विभागात या संदर्भात रिपोर्ट करण्यास सांगितले होते. त्यानुसार सचिन वाझे मुंबई पोलीस खात्यातील नायगाव हत्यारी विभागामध्ये रिपोर्ट करून पुन्हा पोलीस सेवेत रुजू झालेले होते. यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांच्या समोर सचिन वाझे हजर झाले असता त्यांची रवानगी मुंबई पोलीस खात्यातील सीआययु विभागात केली. कोविड संक्रमणामुळे मुंबई पोलीस खात्यामध्ये मनुष्यबळाची कमी असल्यामुळे सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात येत आहे, असे कारण देण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर सुरू असलेला खटला सुरूच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते.
ख्वाजा युनिसच्या आईची मुंबई उच्च न्यायालयात धाव -
सचिन वाझे यांची मुंबई पोलीस खात्यात पुन्हा वर्णी लागल्यानंतर या संदर्भात ख्वाजा युनूसच्या आई कडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाकडून सचिन वाझे यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आल्यामुळे हा न्यायालयाचा अवमान ठरत असल्याचा दावा न्यायालयामध्ये केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अगोदरच सचिन वाझे यांचे निलंबन मुंबई पोलीस खात्यातून करण्यात आले होते. त्यामुळे मुंबई पोलीस खात्याकडून कोर्टाचा कुठलाही हवामान झालेला नसल्याचा युक्तिवाद न्यायालयांमध्ये करण्यात आला होता.
काय आहे ख्वाजा युनूस प्रकरण -
2 डिसेंबर 2002 साली मुंबईत घाटकोपर येथे घडलेल्या बॉम्ब ब्लास्ट संदर्भात परभणी येथील 27 वर्षीय ख्वाजा युनूस यास अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलीस तपासासाठी औरंगाबाद येथे आरोपी ख्वाजा युनूस याला घेऊन जाताना पोलीस वाहनाचा अपघात झाला होता. पोलीस रेकॉर्डनुसार ख्वाजा युनूस हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. मात्र, त्याचा पोलीस कोठडीमध्येच मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. 2003 नंतर अजूनही ख्वाजा युनूसचा तपास लागलेला नाही.