मुंबई - राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यात पालिकेला यश आले आहे. अगदी दाटीवाटीने लोक या भागात राहतात. त्यामुळे धारावीतील कोरोनावर नियंत्रण मिळवणे खूप आव्हानात्क काम होते. पण, नेमके कशा प्रकारे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला याबाबात पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
यावेळी बोलताना दिघावकर म्हणाले, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीत अडीच चौरस किलोमीटर परिसरात 9 ते 10 लाख नागरिक राहतात. लहान घरे असल्याने धारावी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे कठीण होते. याठिकाणी स्थलांतरित कामगारांचाही प्रश्न होता. मात्र, आम्ही 'चेस द व्हायरस' ही योजना या ठिकाणी राबवल्याचे दिघावकर यांनी सांगितले. धारावीमधील 47 हजार लोकांची स्क्रिनिंग आम्ही केली. फिव्हर कॅम्प सुरू केले. त्यामधून समोर आलेल्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यात येत होते. धारावीमधून 11 हजार संशयितांना क्वारंटाइन करण्यात आले होते. धरावी सारख्या वस्तीत आम्ही खासगी डॉक्टरांना विनंती करून त्यांचे क्लिनिक सुरू केले. डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करण्याचे आवाहन केले. खासगी रुग्णालय ताब्यात घेतले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शाळा, हॉटेल या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू केले. कम्युनिटी किचन सुरू करून नागरिकांना अन्नाचे वाटप केल्याचेही दिघावकर यांनी सांगितले.
धारावीत सर्वात मोठे आव्हान होते ते सोशल डिस्टनसिंगचे. या ठिकाणी टाळेबंदी आहे की नाही हा प्रश्न पडत होता. रमजानमध्ये क्वारंटाइन असलेल्या मुस्लीम बांधवांनाही त्यांनी उपवास कसा करायचा हा मोठा प्रश्न पडला होता. मात्र, आम्ही 11 हजार इफ्तारी पाकिटांचे वाटप केले. तसेच रुग्णांच्या जेवणाची योग्य काळजी घेतली, असे दिघावकर यांनी सांगितले.