मुंबई - भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते आमचं युतीचं ठरलंय असे सांगत आहेत. मात्र, भाजपचे मित्रपक्ष असणाऱ्या रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आणि शिवसंग्राम यांचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मित्रपक्षांच्या जागावाटपाचा निर्णय अद्यापही झाला नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपने मित्रपक्षाला एकही जागा सोडली नव्हती. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप मित्रपक्षाला किती जागा सोडणार हा चर्चेचा विषय ठरतोय. मात्र, मित्रपक्षांबाबत कोण होतास तू काय झालास तू अशी चर्चा होत आहे.
भाजप आणि शिवसेनेचा युतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते आहे. शिवसेना १२६ जागांवर तर भाजप १६२ जागा लढवणार आहे. भाजप आपल्या १६२ जागांमधून मित्रक्षाला जागा सोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, मित्रपक्षांसाठी किती जागा सोडणार याचा निर्णय अद्यापही झाला नाही.
रासपची ५७ जागांचा मागणी
भाजपकडे विधानसभेसाठी ५७ जागांची मागणी केली असल्याची माहिती रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी दिली. मित्रक्षाला १८ जागा सोडणार असल्याचे भाजपने यापूर्वी जाहिर केले होते. मात्र, आता रासपने ५७ जागांची मागणी केली आहे. भाजप आता जाणकर यांच्या रासपला किती जागा देते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपच्या वरीष्ठ नेत्यांशी जागावाटपाबाबत चर्चा सुरु असल्याचे यावेळी जानकर म्हणाले. सध्या सेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाचं सुत्र ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, मित्रपक्षांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या राज्यात दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे रासपचे एकमेव आमदार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने रासपला एकही जागा सोडली नव्हती.
हेही वाचा -उद्धव ठाकरे म्हणतात आमचं ठरलंय, पण पाटील म्हणतात अजून ठरायचंय
रयत क्रांती संघटनेची १२ जागांची मागणी-
विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेला १२ जागा सोडण्याची मागणी केल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी दिली. भाजपशी आणखी यासंदर्भातमध्ये बैठक झाली नसल्याचेही ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर - मंगळवेढा यासह इस्लामपूर, शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर, माण, कोरेगाव या जागांसाठी आम्ही आग्रही असल्याचे पाटील म्हणाले. चर्चेअंती जागेचा मुद्दा सुटेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.