मुंबई-एकीकडे देशात सर्वसामान्य जनता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे हैराण होत आहे तर दुसरीकडे आता आणखी एक मोठा झटका नागरिकांना बसला आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना १४ किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी ७६९ रुपये मोजावे लागणार आहे. या दरवाढीबाबत गृहिणीनी नाराजी व्यक्त करत आता काय चुली पेटवायच्या का? असा संतप्त सवाल विचारला आहे.
आता काय चुली पेटवायच्या का? गॅसदरवाढी विरोधात गृहिणी संतप्त दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ
फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर ४ फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ झाली होती. तसेच नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलचे भावही वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३४ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर ९५.१९ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर ८६.०२ रुपयांवर पोहेचले आहेत. आज (सोमवार) दुपारी १२ वाजल्यापासून हे दर लागू झाले आहेत.
गॅसदरवाढीमुळे गृहिणी संतप्त
पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीने नंतर आता गॅसचे दरही वाढले आहेत. या दरवाढीमुळे घर कसं चालवायचं. एकीकडे रोजगार नाही, दुसरीकडे वाढती महागाई जगायचं कसं हेच कळत नाही. आता आम्ही चुली पेटवायच्या का? असा प्रश्न समोर उभा राहिला असल्याचे गृहिणी पूजा दळवी यांनी सांगितले. कोरनामुळे खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पहिलेच हाल सुरू आहेत. त्यामध्ये महागाईमध्ये वाढ होत आहे. गॅस दरवाढीमुळे घराचे बजेट कोलमडले आहे. आमच्याकडे दोन गॅस असल्यामुळे रॉकेल देखील मिळणार नाही. नागरिकांकडे नोकरी नसताना अशा प्रकारची वाढ करणे हे योग्य नाही. महागाई वाढली पण पगार वाढत नाही, असे गृहिणी पौर्णिमा जगताप यांनी सांगितले.
मोदी सरकारवर टीका
काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात झालेल्या राजकीय आंदोलनात मी देखील भाग घेतला होता. मात्र, आता पुन्हा गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. रोजगार नसताना अशा प्रकारची वाढ करणे हे योग्य नाही. मोदी सरकारने आता आम्हाला घरात चूल आणून द्यावी, अशा शब्दात सुचिता चिंदरकर यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.