महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hotel Rate In Mumbai : भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे दर गगनाला!

Hotel Rate In Mumbai : भारत-न्यूझीलंड उपांत्य सामन्यापूर्वी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. येथे सध्या एका दिवसाच्या रुमसाठी तब्बल ८० ते ९० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाचा पूर्ण बातमी.

Hotel Rate In Mumbai
Hotel Rate In Mumbai

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2023, 5:50 PM IST

मुंबई Hotel Rate In Mumbai :सध्या देशात क्रिकेट विश्वचषकाची धूम आहे. स्पर्धेत भारतानं सलग ९ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत बुधवारी (१५ नोव्हेंबर) भारताचा सामना न्यूझीलंडशी आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी मुंबईत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे भाव गगनाला भिडले आहेत.

हॉटेल्सच्या किंमती ८० टक्क्यांनी वाढल्या :मुंबईतील हॉटेलचे दर जवळपास ८० टक्क्यांनी वाढले आहेत. नरिमन पॉइंट येथील ओबेरॉयसारख्या पंचतारांकित हॉटेलला लोकांची खास पसंती असते. सध्या या हॉटेलमध्ये एका रुमसाठी तब्ब्ल ९० हजार रुपये मोजावे लागत आहेत. तसेच ट्रायडेंट हॉटेलमध्ये १४ नोव्हेंबरपासून एका रुमसाठी ३२ हजार रुपये मोजावे लागतायेत. कुलाब्यातील प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये १४ नोव्हेंबरपासून एका रुमसाठी ५६ हजार रुपये एवढा दर आहे. तर शेजारील ताजमहाल टॉवर हॉटलेमध्ये ४१ हजार रुपये भाव आहे. हॉटेल बुकिंग पोर्टलद्वारे ही माहिती मिळाली.

15 ते 16 हजारावरुन 90 हजारपर्यंत :साधारणत:, मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्समध्ये एक दिवसाच्या रुमचा दर सुमारे १५ ते १६ हजार रुपये असतो. तर ताज हॉटेलमध्ये एका दिवसाचे १५ ते २० हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, आता विश्वचषक स्पर्धेदरम्यान मुंबईत मॅच असल्यास येथे तब्बल ८० ते ९० हजार रुपये मोजावे लागत आहेत. याशिवाय, उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी अनेक पंचतारांकित हॉटेल्सनी त्यांचे प्रति दिवस दर ३ हजार ते १० हजार रुपयांवरून १८ हजार रुपयांपर्यंत वाढवले आहेत.

भाव वाढण्याचं कारण काय : मुंबईतील ओबेरॉय आणि ट्रायडेंट हे हॉटेल्स वानखेडे स्टेडियमपासून जवळ आहेत. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या चाहत्यांसाठी या हॉटेल्समध्ये राहण्याचा पर्याय सर्वोत्तम असतो. आता विश्वचषकाचा महत्वाचा सामना येथं होत असल्यानं गेल्या दोन दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू आहे. अनेक चाहते अधिकचे पैसे देऊन रुम बुक करत आहेत. परिणामी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे दर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची माहिती ऑबेरॉय हॉटेलच्या व्यवस्थापकांनी दिली.

हेही वाचा :

  1. World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड दरम्यान उपांत्यपूर्व सामन्याचा रंगणार थरार; चार वर्षानंतरही 'हे' करणार 'पंचगिरी'

ABOUT THE AUTHOR

...view details