मुंबई -राज्यात वाढत्या कोरोनाला ( Corona in Maharashtra ) प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कंबर कसली. त्रिसूत्री नियमांचे पालन करण्याच्या सूचना करत लसीकरणावर भर दिला. राज्यभरात लसीकरणाची जोरदार मोहीम राबवली. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसींची कमतरता भासू लागली. केंद्राकडून ही लसींचा अपुरा पुरवठा होऊ लागल्याने हाफकीन इन्स्टिट्यूटला लस निर्मितीचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी ठेवला होता. केंद्र सरकारने लस निर्मितीला मान्यता दिली. सुमारे 22 कोटी 8 लाख डोस निर्मिती करणे शक्य होणार होते. मात्र, केंद्राच्या निधी अभावी लस निर्मिती कागदावर राहिली आहे.
लस निर्मिती खर्चिक -हाफकीनमध्ये भारत बायोटेक लसींच्या निर्मितीसाठी केंद्राकडून वर्षभराचा कालावधी मिळाला. लस तयार करण्याची यंत्रणा उभारणे खर्चिक असते. केंद्राकडे 287 कोटी तर राज्याकडे 154 कोटी आर्थिक तरतुदीचे प्रस्ताव पाठवले. त्यापैकी राज्य सरकारने 154 कोटींचा संपूर्ण निधी हाफकीनला दिला आहे. केंद्राकडून अद्याप निधी मिळालेला नाही. मुळात, लस निर्मिती करणे खर्चिक बाब आहे. त्यामुळे जोपर्यंत निधी मिळणार नाही, तोपर्यंत लस निर्मिती शक्य नाही, अशी माहिती हाफकीन संशोधन केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.