मुंबई- पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऑनर किलिंगच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आपल्या पोटच्या मुलीचे शेजारच्या युवकासोबत असलेले प्रेमसंबंध लक्षात आल्यानंतर पालकांनी त्यास विरोध केला. मात्र, यानंतरही मुलगी ऐकत नसल्याने, आपली समाजात बदनामी होईल या भीतीने तिच्या आई व भावाने तिची हत्या केली. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी आई आणि भावाला अटक केली आहे.
पापू वाघेला (40) आकाश वाघेला ( 20) अशी आरोपींची नावे आहेत.
गेल्या काही वर्षांपासून पायधुनी परिसरात राहणाऱ्या निर्मला वाघेला (23) या युवतीचे तिच्याच परिसरातल्या एका युवकसोबत प्रेम संबंध होते. या गोष्टीची कल्पना मयत मुलीच्या आईला व भावाला होती. सुरुवातीला मुलीची समजूत घातल्यानंतर ही काही फरक पडत नसल्यामुळे मुलीचे तिच्या आई व भावासोबत सतत भांडण होत होते.
17 नोव्हेंबर रोजी मृत निर्मला हिचे प्रेम प्रकरणावरून तिच्या आई व भावासोबतपुन्हा भांडण झाले होते. यावेळेस मी घरातून निघून जात असल्याचे निर्मला हिने सांगितल्यानंतर आई पापू वाघेला हिने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. यामध्ये तिच्या मुलानेही तिची मदत केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.