मुंबई Honor Killing in Mumbai :प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलानं त्याच्या मुलाच्या मदतीनं तरुणीसह तिच्या प्रियकराला संपवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही ऑनर किलिंगची घटना मुंबईतील गोवंडी परिसरात उघडकीस आली. या घटनेतील प्रियकर हा उत्तरप्रदेशातील असल्याचंही पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केलं. करण रमेशचंद्र असं या घटनेतील मृत प्रियकराचं नाव आहे. तीन आरोपींना अटक तर तीन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त राजपूत यांनी सांगितलं आहे.
गोवंडीत आढळला होता अनोळखी मृतदेह :गोवंडी पोलीस ठाण्याच्या परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना 14 ऑक्टोबरला उघडकीस आली होती. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात भादंवी कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन होनवडकर यांच्या पथकाकडून सुरू होता. या तपासात धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत तरुण करण रमेशचंद्र हा उत्तरप्रदेशातील असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. त्यामुळे पोलिसांनी या खुनाचे दागेदोरे शोधण्यास सुरुवात केली असता, मोठी खळबळजनक माहिती समोर आली. प्रेमविवाह केल्यानं हा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं पोलीस उपायुक्त हेमराज राजपूत यांनी यावेळी सांगितलं.
प्रेमविवाह केल्यानं ऑनर किलिंग :मृत करण रमेशचंद्र याच्या खुनाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी मृताच्या सासऱ्याला संशयावरुन ताब्यात घेतलं. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यानं मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं मृत करण रमेशचंद्र याचा खून केल्याचं कबूल केलं. मुलीनं आंतरधर्मीय विवाह केल्यानं या करणचा खून करण्यात आल्याची कबुली मृताच्या सासऱ्यानं दिली. यासह करणच्या पत्नीचादेखील खून केल्याची कबुली सासऱ्यानं दिली. त्यामुळे वडिलानचं मुलीचा आणि जावयाचा खून केल्यानं पोलीसही चक्रावून गेले.