मुंबई -मुंबईत राहणाऱ्या एका नवदाम्पत्याला त्यांच्याच नातेवाइकांनी दिलेले विदेशी हनिमून टूरचे पॅकेज महागात पडला आहे. हनिमूनसाठी गेलेल्या मोहम्मद शरीक आणि त्याची पत्नी ओनीबा कौसर शकील अहमद या दोघांना 4 किलो हशिश या अमली पदार्थाची तस्करी करण्यासंदर्भात अटक करण्यात आली आहे. 6 जुलै 2019 रोजी या दोघांना दोहा विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेथील न्यायालयाने या दोघांना 10 वर्षांची सक्त मजुरी व 1 कोटींचा दंड ठोठावला आहे. मात्र, जवळच्या नातेवाइकांनी या दोघांच्या बॅगेत गुपचूप अमली पदार्थ ठेवले असल्याचा आरोप ओनीबाच्या वडिलांनी केला आहे.
ओनीबा हिचे वडील शकील अहमद कुरेशी यांनी सांगितल्यानुसार मोहम्मद शरीक आणि त्याची पत्नी ओनीबा कौसर शकील अहमद या दोघांना त्यांचे लग्न झाल्यानंतर तब्बसुम रियाज कुरेशी व तिचा साथीदार निजाम कारा या दोघांनी हे हनिमून टूर पॅकेज भेट म्हणून दिले होते. या दोघांनी एका बॅगेत हशिश अमली पदार्थ लपवले होते. मात्र या पॅकेटबद्दल त्यांना विचारले असता, कतारमधील माझ्या मित्राला एक तंबाखू हवी आहे. ती तेवढी तिकडे गेल्यावर दे, असे शकील यांना तब्बसुम हिने सांगितले होते. या संदर्भात तबस्सुम व निजाम कारा या दोघांच्या विरोधात शकील अहमद कुरेशी यांनी एनसीबीकडे तक्रार दाखल केली आहे.